मुंबई : राज्य सरकारने धारावीचा विकास करण्याचे कंत्राट अदानींच्या कंपनीला दिले आहे. धारावीतील टीडीआरचा सरकारने हिशेब द्यावा. धारावीसह मुंबईतील तीन मोठे प्रकल्पही अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे, असा आरोप करून ठाकरे गटाने अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चावरून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तत्कालीन आघाडी सरकार व उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिका-यांची बैठक बोलावली आहे. वांद्रे येथील बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. बैठकीत लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेतला जाणार आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.
सेटलमेंट करण्यासाठी ठाकरे गटाने गौतम अदानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. महाविकास आघाडीला आता जाग आली आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाला अदानी समूहाकडून पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘पारदर्शक, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोली लावल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले. या निविदेतील अटी या महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चित झाल्या होत्या, असे अदानी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत काहीजणांकडून चुकीची माहिती पसरविण्याचा एकत्रित प्रयत्न सुरू आहे, असे अदानी समूहाने म्हटले आहे. ठाकरे गटाच्या मोर्चानंतर अदानी समूहाकडून हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुंबईत धारावी टी जंक्शन ते अदानी समूहाच्या वांद्रे कुर्ला संकुलातील कार्यालयापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.
अदानी समूहाला दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नुकताच मोर्चा काढला. या मोर्चातून उद्धव ठाकरे यांनी अदानींसह राज्यातील सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.