20.3 C
Latur
Wednesday, January 29, 2025
Homeमहाराष्ट्रथंडीचे प्रमाण घटले, आता पावसाचा इशारा

थंडीचे प्रमाण घटले, आता पावसाचा इशारा

वातावरणात बदल, महाराष्ट्र वगळता देशात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी
मागच्या काही दिवसांत राज्यासह देशात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. देशातील अनेक भागांत किमान तापमानात वाढ झाली असून, थंडी कमी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून, दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडी गायब असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता व्यक्त होत आहे.

आयएमडीने दिलेल्या इशा-यानुसार ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पावसासह बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे. दोन फेब्रुवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

यापैकी हिमाचल प्रदेश आणि जम्मू -काश्मीरमध्ये पावसासोबतच बर्फवृष्टीदेखील होणार असल्याने पर्यटकांसाठी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने उत्तर भारतातदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली एनसीआर आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी पाऊस, बर्फवृष्टीची शक्यता
हवामान विभागाकडून देशाच्या अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला असून, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे म्हटले आहे. सोबतच काही भागांमध्ये बर्फवृष्टीचादेखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता विजा, पाऊस, आणि बर्फवृष्टी असे तिहेरी संकट देशावर असणार आहे.

राज्यात पावसाची शक्यता कमी
देशात ब-याच भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे. परंतु आभाळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणातील गारठा कमी झाला आहे. पुढील ४ ते ५ दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR