चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर अफगाणिस्तानने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला. नवव्या क्रमांकावरच्या अफगाणिस्तानने दुस-या क्रमांकावरच्या पाकिस्तान संघाला चारीमुंड्या चित केले. ‘पाक क्रिकेट का जनाजा निकल गया’. छोट्या माश्याने मोठा मासा गट्टम केला. विस्थापिताने प्रस्थापित्याला गचांडी दिली. अफगाण संघाचे कसे, किती कौतुक करावे तेच कळत नाही. भूकंपाने हादरलेल्या आणि तालिबानी हुकूमशाही प्रवृत्तीने भेदरलेल्या अफगाण देशाचे खेळाडू इतरत्र विखुरलेले आहेत.
या खेळाडूंना त्यांच्या देशाच्या क्रिकेट मंडळाकडून फक्त १० हजार रुपये मानधन मिळते तरीही या संघाने इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांना पराभवाचे पाणी पाजून लाख मोलाची नव्हे डॉलर मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या या अगाध कामगिरीचे वर्णन ‘मुंगी उडाली आकाशी, तिणे गिळिले सूर्याशी’ असेच करावे लागेल. विश्वकप स्पर्धेत पदार्पण करणा-या १८ वर्षीय तरण्याबांड नूर अहमद या डावखु-या स्पीनरने अब्दुल्ला शफिक, बाबर आझम आणि रिझवान हे तीन मोहरे ४९ धावांत गिळून आपल्या संघाच्या ऐतिहासिक विजयात मोठा वाटा उचलला.
नूर आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सतर्फे खेळतो. एक लाख प्रेक्षकांसमोर मानसिक संतुलन कसे राखायचे, दबाव कसा सहन करायचा हे त्याला चांगले ठाऊक आहे. यंदाच्या स्पर्धेत पाक संघाची त्रेधातिरपीट उडाली आहे. कोणतीही योजना न आखता हा संघ मैदानावर उतरतो अन् मार खाऊन तंबूत परततो. बाबरसारखा बिनडोक कर्णधार त्यांना लाभला आहे. संघात निश्चितपणे दुफळी माजलेली आहे. ‘आमच्यासारखे आम्हीच’ ही गोलंदाजांच्या आणि फलंदाजांच्या डोक्यातली नशा अजून उतरलेली नाही… मग जनाजा निघण्याशिवाय दुसरे काय होणार? ४२ षटकांपर्यंत तुम्ही दोनशेच्या घरातच राहणार असाल तर तुमच्याकडे ‘कुदरत का निझाम’ ढुंकूनही पाहणार नाही! २८३ धावांचे आव्हान अफगाणसाठी अवघडच होते. परंतु हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाण संघाने नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध योजना आखून महाकाय लक्ष्य सहज गाठले.
‘रावळपिंडी एक्स्पे्रस’च्या वेगात गोलंदाजी करणा-या हॅरिस रौफच्या पहिल्याच षटकात इब्राहिम झाद्रानने चार सणसणीत चौकार ठोकले तेव्हाच अफगाणचे इरादे स्पष्ट झाले. गुरबाझ-झाद्रानने पावर प्लेमध्ये ६० आणि १२६ चेंडूत १३० धावांची सलामी दिली. तेव्हा पाक पर्वत वितळायला सुरुवात झाली. २०० चेंडूत १९० धावा निघाल्या तेव्हा २८३ धावांचा पर्वत टेकडीत रूपांतरीत झाला. झाद्रान ८७ धावा काढून बाद झाला तेव्हा रेहमत-शाहिदी जोडीने ९३ धावांची नाबाद भागीदारी करत आठ गडी आणि एक षटक शिल्लक ठेवून ऐतिहासिक विजय मिळवला.
शाहिदीने एक बाजू लावून धरली आणि दुस-या बाजूने रेहमतने साहसी फटके मारले. या जोडीने धोकादायक फटके मारण्याचे टाळले आणि विराट कोहलीचा आदर्श गिरवत एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. त्यामुळे नेहमीच धावसरासरी नियंत्रणात राहिली. पाकच्या शादाब, मीर आणि इफ्तिखार या फिरकी त्रिकुटाने १३१ धावा दिल्या मात्र बळींचा रकाना वांझोटा राहिला. अफगाणच्या नबी, राशीद, नूर या त्रिकुटाने १२१ धावा देत ४ बळी घेतले. फिरकीतील हा फरक ऐतिहासिक ठरला. मुंगीने मेरू पर्वत गिळला तो असा!