प्रयागराज : प्रयागराजला होत असलेल्या महाकुंभमध्ये जाण्यासाठी देशभरातून लोक येत आहेत. ट्रेन फुल असल्याने लोक वाहनांनी येत आहेत. गेल्या आठवड्यात ३०० किमीपर्यंत चोहोबाजुला वाहतूक कोंडी होती. यामुळे भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अनेकांनी वाहने तिथेच ठेवून कित्येक किमी चालत महाकुंभ गाठला होता. अशातच बिहारच्या तरुणांनी नदीचा मार्ग निवडत महाकुंभात स्रान केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
बिहारच्या सात तरुणांनी आधी रस्तेमार्गे महाकुंभला जायचा प्लॅन आखला होता. परंतू, वाहतूक कोंडीची माहिती मिळताच त्यांनी बोटीची व्यवस्था केली. बोटीने ते ८४ तासांचा प्रवास करत ५५० किमी लांब असलेल्या युपीतील प्रयागराजला पोहोचले आणि तिथे संगमावर डुबकी घेऊन पुन्हा माघारीही परतले.
या तरुणांनी गंगा नदीतून बक्सर ते प्रयागराज संगम असा प्रवास केला आहे. कम्हरिया गावातील हे तरुण आहेत. सुखदेव. आडू, सुमन आणि मुन्नू यांच्यासह सातजणांनी हा धक्कादायक प्रवास केला आहे. या लोकांनी नदीतून प्रवास करण्यासाठी बोटीवर दोन मोटर जोडल्या होत्या. प्रवासात एक मोटार बंद पडली तर दुसरी वापरता येईल असा उद्देश होता. नदीतून पुढे जाताना मोटर तापत होती, ती थंड करण्यासाठी ते पुढचे चार पाच किमी काठीने किंवा वल्हवत अंतर पार करत होते. एक बंद केली की दुसरी मोटर वापरत त्यांनी हा प्रवास केला. तसेच आळीपाळीने ते बोट चालवत होते. तसेच झोपत होते. पाच दिवसांत या लोकांनी बक्सर ते प्रयागराज आणि पुन्हा माघारी असा ११०० किमींचा प्रवास पूर्ण केला.
हे सातही जण ११ फेब्रुवारीला निघाले होते, ते १३ तारखेला पहाटे संगमावर पोहोचले होते. १६ तारखेला रात्री १० वाजता पुन्हा बक्सरला पोहोचले होते. या प्रवासासाठी त्यांना एकूण २० हजार रुपयांचा खर्च आला होता. यामध्ये पेट्रोल, रेशन आणि अन्य खर्च होता. हा प्रवास सामान्य लोक करू शकत नाहीत. ज्यांना बोट चालविण्याचे ज्ञान आहे, तेच हा प्रवास करू शकतात असे त्यांनी सांगितले.