सोलापूर : केवड (तालुका माढा) येथील भैरवनाथ प्रशाला आणि सासुरे (तालुका बार्शी) येथील जिवन विकास विद्यामंदिर या शाळात बोगस सचिव विकास गौरीहर पाटील व शेख मोहम्मद सय्यदसोो यांनी केलेल्या बेकायदेशीर बाबींची सखोल चौकशी होऊन उभयतावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेने बोंबाबोंब आंदोलन सुरू केले.
सासुरे येथील ग्रामविकास मंडळ, संचलित भैरवनाथ प्रशाला केवड आणि सासुरे येथील जीवन विकास विद्यामंदिर शाखा असून ०१ जुलै, २०१८ रोजी संस्थेचे सचिव म्हणून बापूसाहेब शहाजी नेमाने यांची व ३० जुलै २०१९ रोजी बाळासाहेब बिभीषण पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अशा स्थितीत विकास गौरीहर पाटील या बोगस सचिवाने, त्यांचा संस्थेशी काही एक संबंध नसताना बोगस लेटर पॅड छापून भैरवनाथ प्रशाला केवड येथील सहशिक्षिका सुनंदा शामराव बनसोडे यांचा ०१ जून ते ३० नोव्हेंबर २०२२ या काळात प्रभारी मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव तयार करून त्यास शिक्षण विभागाची मान्यता घेऊन शासनाची फसवणूक केली.
शेख मोहम्मद सय्यद सो यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या प्रतिज्ञा लेखामध्ये सचिव पदाचा रीतसर चार्ज बापूसाहेब शहाजी नेमाणे यांच्याकडे दिलेला असताना त्यांनी सचिव पदाची कोणताही अधिकार नसताना अनेक प्रकरणात शिक्षण विभागाची पर्यायाने शासनाची फसवणूक केल्याचा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा आरोप आहे.
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर उर्फ दिनकर देशमुख, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव बापूसाहेब नेमाणे, संस्थेचे संचालक रामचंद्र करंडे, युवराज करंडे, बाबासाहेब साबळे, रवींद्र मुठाळ आणि अंकुश वाघमारे या बोंबाबोंब आंदोलनात सहभागी झाले असून उभयतांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे बोंबाबोंब सुरू राहील, असे सांगण्यात आले.