नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटत आले तरी राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव करत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतरही भाजपाला आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करता आलेला नाही. असे असतानाही भाजपकडून दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानामध्ये शपथविधीची तयारी करण्यात येत आहे. त्यावरून आम आदमी पक्षाने भाजपावर खोचक टीका केली आहे. वरात, मंडप सगळे काही तयार आहे. पण नवरदेवाचा पत्ताच नाही, असा टोला आपचे दिल्लीमधील प्रदेश संयोजक गोपाल राय यांनी लगावला आहे.
दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाला होत असलेल्या उशिरावरून टीका करताना गोपाल राय म्हणाले की, भारताच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे. वरात तयार आहे. मंडपही तयार आहे. मात्र नवरदेव कोण असेल हेच भाजपाला ठरवता येत नाही आहे. गोपाल राय पुढे म्हणाले की, भाजपा सारं काही करत आहे. मात्र त्यांना मुख्यमंत्री ठरवता येत नाही आहे. आतापर्यंत भाजपने आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावलेली नाही. हे भाजपावाले पुढच्या पाच वर्षांत आणखी काही विक्रम रचतील. भाजपा अंतर्गत चढाओढ लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. आता दिल्लीच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजपाने केली पाहिजेत असा टोलाही गोपाल राय यांनी लगावला.
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. तर ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले होते. त्यामध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवताना ४८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. तर मागच्या दहा वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले होते.