नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच सलग दुस-या दिवशी सोन्याने तेजीचा रंग उधळला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांच्या आर्थिक परिणामांवरील अनिश्चिततेमुळे मंगळवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला. आता प्रतितोळ््यासाठी ८८ हजार रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या दरात १५ हजार रुपये तर वर्षभरात प्रतितोळा २२ हजार रुपयांची वाढ झाली.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने नवनवीन रेकॉर्ड केले आहे. अमेरिकेतील टॅरिफविषयक अनिश्चितता, व्यापार तणाव आणि फेडरल रिझर्व्हकडून चलनविषयक धोरणात सवलती मिळण्याची वाढती अपेक्षा यांच्यात जागतिक बाजारपेठेत मजबूत कल असल्याने सराफा बाजारात सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १८ मार्च रोजी सोन्याचा वायदा ८८,४१८ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला तर ट्रम्पच्या आक्रमक टॅरिफ धोरणांमुळे गंभीर आर्थिक परिणाम होण्याची चिंता असताना गुंतवणूकदारांनी सुरक्षित संपत्तीकडे धाव घेतल्याने सत्राच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती प्रति अंश ३,०१२.०५ डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या.
जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चिततेच्या काळात खरेदी वाढल्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात. पण वाढीव व्याजदर सोन्यासाठी नकारात्मक ठरतात. जास्त व्याज दरांमुळे बाँड्स आणि बचत खाती यांसारख्या स्थिर उत्पन्न मालमत्ता चांगले परतावा देतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोने कमी आकर्षक बनते.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक-कमोडिटीज सौमिल गांधी यांनी सांगितले की, मौल्यवान धातूंच्या विक्रमी तेजीत अनेक घटकांचा वाटा आहे, ज्यामध्ये मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी आणि जागतिक आर्थिक अस्थिरता यांचा समावेश आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि आर्थिक धोरणांमुळे सुरक्षित मानल्या जाणा-या मालमत्तेची मागणी वाढली आहे.
अमेरिकी फेड ओपन मार्केट कमिटीवर नजर
जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता लक्ष १९ मार्च रोजी अमेरिकी फेड ओपन मार्केट कमिटीच्या धोरणात्मक निकालाकडे लागून असेल. यूएस फेड रिझर्व्ह पॉलिसी दर अपरिवर्तित ठेवण्याची अपेक्षा असून एक आक्रमक निर्णय सोन्याच्या किंमतीवर दबाव आणू शकतो, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
सोने बनणार लखपती?
सोने हा मौल्यवान धातू लवकरच प्रति १० ग्रॅम १,००,००० रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता कमी आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या मानव मोदींच्या मते सोन्याच्या किमती लवकरच ३,१०० अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढू शकतात आणि वर्षभर याच्या आसपास राहतील. भारतीय रुपयांमध्ये सोने रु ९१,५०० ते ९२,००० पर्यंत पोहोचू शकते. पण यावर्षी एक लाखांवर पोहोचण्याची शक्यता कमी आहे, असेही तज्ज्ञ सांगतात.