मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवृत्त झाल्यामुळे रिकामा झालेला मंत्रालयासमोरील अजिंक्यतारा हा शासकीय बंगला आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना देण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे शिरसाट यांचा मुक्काम मंत्रालयामोरील बंगल्यात असणार आहे.
अंबादास दानवे यांनी मागील अडीच वर्षे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून कामकाज केले. विरोधी पक्षनेते असल्याने मंत्रिपदाच्या दर्जानुसार दानवे यांना निवासस्थानासाठी मंत्रालयासमोरील अजिंक्यतारा हा शासकीय बंगला देण्यात आला होता. २९ ऑगस्टला त्यांची सदस्यपदाची मुदत संपल्यानंतर त्यांना हा बंगला रिकामा करण्यास सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून रिकामा असलेला बंगला आपल्याला मिळावा, अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली होती. त्यानुसार शासनाने मंत्रालयाशेजारील अजिंक्यतारा बंगला शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिरसाट यांना यापूर्वी मलबार हिल येथील अंबर हे निवासस्थान देण्यात आले होते.

