21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रउमेदवाराने पोतं भरून आणले चिल्लर

उमेदवाराने पोतं भरून आणले चिल्लर

पैसे मोजताना कर्मचा-यांची दमछाक

यवतमाळ : प्रतिनिधी
देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दुस-या टप्प्यात २६ एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना सोमवारी (१ एप्रिल) अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी १२,५०० रुपयांचे चिल्लर (सुटे पैसे/नाणी) नामनिर्देशन पत्राबरोबर निवडणूक आयोगाकडे भरले आहे. गेडाम यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मनोज गेडाम यांनी १२,५०० रुपयांचे चिल्लर निवडणूक विभागाकडे सुपुर्द केले होते. हे पैसे मोजताना कर्मचा-यांची दमछाक झालेली पहायला मिळाली. त्यामुळे गेडाम यांनी ही रक्कम स्वत: मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावी, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर गेडाम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी ही नाणी मोजून वेगवेगळ्या लहान पिशव्यांमध्ये बांधून निवडणूक आयोगाकडे सादर केली.

सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना स्थानिक लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात. मी गोरगरीब जनतेची अनेक वर्षे सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार आहे असे गेडाम म्हणाले. जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यासाठी घेऊन आलो आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR