21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रधुळ्यात नाराजी रोखण्याचे आव्हान

धुळ्यात नाराजी रोखण्याचे आव्हान

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याची संधी काँग्रेससमोर चालून आली. त्यामुळे तगडे आव्हान उभे करणारा नेता मैदानात उतरविण्याऐवजी नाशिक जिल्ह्यातील माजी मंत्री शोभा बच्छाव यांना मैदानात उतरवून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु या उमेदवारीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस निष्ठावानांमध्ये तीव्र नाराजी पसरली. काँग्रेसमध्ये काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर इच्छुक होते. त्यांनी लगेच राजीनामा दिला. तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनीही आग्रह धरला होता. परंतु त्यांना डावलून बच्छाव यांना संधी दिल्यामुळे धुळे काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले. त्यामुळे आता उमेदवारीपेक्षा डॅमेज कंट्रोल हे काँग्रेससमोर आव्हान आहे.

भाजपने आधीच विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली. भामरे यांच्यावरून भाजपमध्ये नाराजी आहे. तसेच महायुतीतदेखील त्यांना विरोध होत आहे. परंतु पक्षश्रेष्ठींनी नाराजांना समज देऊन सध्या तरी अंतर्गत नाराजी दूर केली. परंतु भाजपमध्ये भामरे यांच्याबाबत अनुकूलता नाही. यासोबत शिंदे गटाचे दादा भुसे यांच्या चिरंजीवांसाठीही या मतदारसंघावर दावा केला गेला होता. परंतु हा मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यामुळे भाजपने आधीच आपला उमेदवार जाहीर करून मित्रपक्षांचे तोंड बंद करून टाकले. आता सुभाष भामरे कामाला लागले आहेत. मात्र, भाजपमध्ये त्यांच्याबद्दल असलेली अंतर्गत नाराजी आणि मित्रपक्षांत समन्वयाचा अभाव याचा फायदा काँग्रेसला उठवता येणे शक्य आहे. परंतु काँग्रेसमध्ये तर त्यापेक्षा मोठे बंड झाले.

डॉ. शोभा बच्छाव या माजी मंत्री आहेत. त्यांचेही नाशिक जिल्ह्यात चांगले प्रस्थ आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने विचारपूर्वक त्यांची उमेदवारी टाकली. त्या पाठीमागे जर धुळे जिल्ह्याची ताकद लावली असती, तर ही रणनीतीदेखील काँग्रेसला फायद्याची ठरली असती. परंतु गरज होती एकजुटीने लढण्याची आणि रणनीती आखण्याची. खरे म्हणजे देशात भाजपने काँग्रेससमोर आव्हान उभे केलेले असताना किमान याचा विचार करून काँग्रेसने एकजुटीने लढत देऊन आव्हानाचा सामना करणे आवश्यक आहे. परंतु त्यापेक्षा बंडखोरीलाच अधिक उधाण येत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात याचीच प्रचिती आली.
डॉ. बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच धुळ्यात नाराजीसत्र सुरू झाले. त्यातून इच्छुक असलेल्या काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी राजीनामा दिला. तसेच नाशिकच्या जिल्हाध्यक्षांनीही राजीनामा दिला. हे राजीनामासत्र सुरू होताच खुद्द डॉ. शोभा बच्छाव यांनी थेट धुळ्यात येऊन सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु संताप अनावर झाल्याने काँग्रेसचे पदाधिकारी ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे डॉ. शोभा बच्छाव काहीही न बोलता परतल्या.

खरे तर काँग्रेस पक्ष भामरे यांना तोडीस तोड उत्तर देणारा नेता मैदानात उतरवेल, असे वाटत होते. त्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांना मैदानात उतरविले जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु मागच्या वेळी त्यांना सपाटून मार खावा लागला. त्यामुळे कदाचित त्यांनी यावेळी नकार दिला. त्यामुळे पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष श्­यामकांत सनेर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. तथापि, प्रमुख इच्छुक डॉ. शेवाळे, सनेर यांची नावे बाजूला सारत पक्षश्रेष्ठींनी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे असंतोषाचा स्फोट झाला. मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसकडे एकच जागा आहे. महायुतीकडे ३ आणि एमआयएमचे २ आमदार आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने एकदिलाने मैदानात उतरणे आवश्यक आहे.

निष्ठावंतांत नाराजी
धुळे लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांत भाजपला टक्कर द्यायची म्हणजे काँग्रेसचा उमेदवार सर्वच अंगांनी तगडा असला पाहिजे, असा विचार काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला. त्यामुळेच त्यांनीही भाजपमधील नाराज, शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते चर्चेत आणले आणि ऐनवेळी डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केल्याने नाराजीचा स्फोट झाला.

भामरेविरोधाची सुप्त लाट
डॉ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीलाही भाजपमधून विरोध झाला होता. परंतु आता विरोध मावळल्याचे चित्र दिसत आहे. भामरे आता प्रचाराच्या कामाला लागले आहेत. परंतु भाजपमध्येही डॉ. भामरे यांच्या विरोधात नाराजीची सुप्त लाट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पक्षांतर्गत आव्हान आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR