सेलू/प्रतिनिधी
भेंडीबजार घराण्याचे युवा कलावंत उस्ताद विलायत खान यांच्या परंपरेतील सतारवादक मेहताबअली नियाजी यांच्या वादनाने येथील हरिभाऊ चारठाणकर संगीत समारोहाची सांगता झाली. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या संगीत मैफिलने सेलूकरांना मंत्रमुग्ध केले. या संगीत मैफलला दोनही दिवस सेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सेलूकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या संगीत पर्वणीचा लाभ घेतला.
धारवाड येथील पं. कैवल्यकुमार गुरव यांच्या सारख्या दिग्गज कलावंताच्या सादरीकरण पश्चात युवा कलावंताचे सादरीकरण हे एका अर्थाने त्या कलावंतासाठीचे आव्हानच होते. मेहताबने ते यशस्वीपणे पेलून शिखर मैफलीने संगीत समारोहाची सांगता केली हे विशेष. राग बागेश्रीने त्यांनी सतार वादनास सुरूवात केली. त्यांनी सादर केलेल्या पंजाबी धूनला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तबला वादक स्वप्निल भीसे सोबत त्यांची जुगलबंदी मैफलीची उत्कटता वाढविणारी होती.
संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर स्मृती संगीत समारोहाच्या दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरूवात प्रा.कृष्णराज लव्हेकर यांच्या गायनाने झाली. त्यांच्या बहुश्रृत अशा यमन रागाच्या लडिवाळ प्रस्तुतीकरणाने रसिक सुखावले.निसर्गदत्त प्रतिभा, आवाजातील फिरत, दमदार आलापी, अल्पस्वल्प प्रमाणात परंतू कल्पकतेने केलेला सरगमचा वापर, बहेलावे, तान क्रियेमुळे तासाभराच्या सादरीकरणात प्रवाहीपणं होतं. त्यांना साथसंगत करणारे डॉ. प्रशांत जोशी सावरगांवकर (तबला), शांतीभुषण चारठाणकर (हार्मोनियम) यांच्या पूरक साथसंगतीमुळे मैफलीस रंग चढत गेला.
जा चला जा चला जारे .. छेडोना हमारी बाट या तिनतालात व त्यानंतर सादर झालेल्या तरान्यात जुगलबंदीची झलक पहायला मिळाली. लालशालजोडी नाट्यगीताने त्यांनी आपले गायन संपविले. पं. कैवल्यकुमार गुरव यांच्या लयकारीयुक्त गायनाची अनुभूती विद्यमान पिढीतील किराणा घराण्याचा आश्वासक सूर म्हणजे पं.कैवल्य कुमार गुरव (हुबळी) संगीत समारोहातील त्यांचे गायन रसिक श्रोत्यासाठीची मर्म बंधनाची ठेव ठरून गेली. जाणकारांचे तर सोडा सर्वसामान्य रसिक देखील गायनामुळे विलक्षण प्रभावित झाले.
तिन्ही सप्तकात लिलया संचार ही दुर्मिळ क्षमता असणा-या या साधकाने मारूबिहागची अनोख्या पद्धतीने उकल केली. वैविध्यपूर्ण तानांची बरसात करतांना रसिकांना खिळवून ठेवण्याची किमया करून दाखविली. शूरा मी वंदिले नाट्यगीतात त्यांनी केदारच्या कणस्वरांची केलेली पेरणी सुखावह वाटली. रामदासांचा येथे का रे उभा श्रीरामा अभंग सादर केला. गायना दरम्यान पंडीतजींनी किराणा घराण्याच्या गायकीचे वैशिष्टे, तानक्रीया विषयी विवेचन करतांना गमकयुक्त तान, बिजलीकी तान, घसीट तान, बकरी तान, सरपट तानचा वापर करीत त्यांचे वेगळेपण दाखवून दिले. तबलावादक अनिरुद्ध देशपांडे, हार्मोनियम वादक शांतीभुषण देशपांडे या चारठाणकर बंधूंनी समर्थपणे साथसंगत करीत मैफलीत एका उंचीवर पोहचविले.