मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सुसज्ज सीएम डॅशबोर्डचे उद्घाटन केले आहे. या उद्घाटनाला आशिष शेलार उपस्थित होते. या सीएम डॅशबोर्डद्वारे सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट पाहता येणार आहे. तसेच मुख्यमंत्री जिल्हानिहाय प्रगतीचा आढावाही याद्वारे घेतला जाणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. महायुती सरकार सत्तेत आल्यानतंर सध्या फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु आहे. ३ मार्च ते २६ मार्च या कालावधीत मुंबईत हे अधिवेशन पार पडत आहे. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. आता नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मोबाईलवरून सर्व अधिकारी आणि योजनांवर थेट वॉच ठेवणार आहेत.
दररोज डेटा अपडेट होणार
या सीएम डॅशबोर्डमध्ये दररोज डेटा अपडेट होणार आहे. यात अॅम्बुलन्स लाईव्ह ट्रॅक करता येणार आहे. तसेच त्यातील डॉक्टर, चालकाला फोनही करता येणार आहे. या डॅशबोर्डद्वारे राईट टू सर्व्हिसचाही दैनंदिन आढावा घेता येणार आहे. तसेच कोणती प्रकरणे अडकली, कोणती सुटली आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रलंबित हे देखील मुख्यमंत्र्यांना कळणार आहे.
राज्य आणि केंद्राच्या सर्व योजनांची प्रगती
मुख्यमंत्री वॉररूममधील सर्व प्रकल्पांचा आढावा येथूनच घेता येणार आहे. राज्य आणि केंद्राच्या सर्व योजनांची प्रगती पाहता येणार आहे. अन्य कुठलेही डॅशबोर्ड असतील तरी त्याचा उगम या सीएम डॅशबोर्डवर असेल, असेही सांगितले जात आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या २६ नव्या वेबसाईटचे सुद्धा याच बैठकीत लोकार्पण करण्यात येईल. ही संकेतस्थळे दिव्यांग अनुकूल आणि माहिती अधिकार सेवायुक्त असणार आहे.