सेऊल : अमेरिकेने दक्षिण कोरियामध्ये युद्धनौका तैनात केल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला धमकावण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियातील अमेरिकन विमानवाहू जहाज आणि इतर लष्करी कारवायांवर संतप्त झालेल्या किम यो जोंगने अमेरिकेला सूड उगवण्याची धमकी दिली आहे. किम यो जोंग यांनी हे अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांचे संघर्षमय आणि वेडेपणाचे पाऊल असल्याचे वर्णन केले.
त्यांचा इशारा म्हणजे शस्त्राच्या चाचणीला ते गती देणार आणि अमेरिकेविरुद्ध संघर्षाची भूमिका कायम ठेवेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, ते राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी किम जोंग उनशी संपर्क साधतील. आपल्या पहिल्या कार्यकाळात डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचीही भेट घेतली होती.
एका निवेदनात, किम यो जोंग यांनी अमेरिकेवर उत्तर कोरियाबद्दलचे त्यांचे शत्रुत्वपूर्ण आणि संघर्षपूर्ण हेतू स्पष्टपणे दाखवल्याचा आरोप केला. कोरियन द्वीपकल्पात अमेरिकेच्या धोरणात्मक संसाधनांच्या तैनातीमुळे उत्तर कोरियाच्या सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होतो. रविवारी, अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सन आणि तिचा स्ट्राइक ग्रुप दक्षिण कोरियात पोहोचला आहे.
उत्तर कोरियाने केली शस्त्रास्त्रांची चाचणी
उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वी शस्त्रास्त्रांची चाचणी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाला युद्धनौकांचा ताफा पाठवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही किम जोंग उन यांना हुशार माणूस म्हटले होते. आता त्यांचे सरकार उत्तर कोरियाविरुद्ध कठोर कारवाई करत आहे.