पुणे : अर्थव्यवस्थेची खोटी आकडेवारी, महागाई, बेरोजगारी, उद्योगांची बिकट स्थिती, देशाचे बिघडलेले सामाजिक आरोग्य, बिघडलेले राजकारण, प्रसिद्धीचा हव्यास, आदि मुद्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करत अर्थमंत्री सीतारामन यांचे पती, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. परकला प्रभाकर यांनी देशातील भीषण वास्तव मांडले आहे.
ते पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत ‘नव्या भारताची राजकीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. डॉ. प्रभारक हे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आहेत. त्यामुळे त्यांची ही वक्तव्य देशभरात चर्चेत आहेत. केंद्र सरकारवर गंभीर आरोप करताना डॉ. परकला प्रभाकर म्हणाले, केंद्र सरकारने सांख्यिकी जाहीर करणे बंद केले आहे. एक काळ असा होता की जगभरात भारताच्या सांख्यिकीबाबत आदर, विश्वास होता. आज त्यावर शंका घेतली जाते. पण सरकारला झपाट्याने विकास, प्रगती होत असल्याचे दाखवण्याची घाई झाली आहे.
दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जगात १४३ व्या स्थानी असलेला भारत २०४७ मध्ये विकसित राष्ट्र कसा होईल, असा सवाल करत प्रभाकर यांनी मोदी सरकारची पोलखोल केली. मोदी सरकारवर घणाघात करताना डॉ. प्रभाकर म्हणाले, देशात रोजगाराची स्थिती गंभीर आहे. रेल्वेने बिगर तांत्रिक नोक-यांच्या ३५ हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यासाठी १ कोटी २५ लाख तरुणांनी अर्ज केला होता. देशातील राजकीय दुर्दशा मांडताना डॉ. प्रभाकर म्हणाले, पूर्वी प्रत्येक पक्ष आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, पण त्यांच्यासारखे नाही असे म्हणायचा. पण आता प्रत्येक पक्ष आम्ही हिंदू आहोत, पण त्यांच्यासारखे नाही असे म्हणतो. हा बदल हळूहळू घडला आहे. त्यासाठी वर्षानुवर्षं अत्यंत शांतपणे, कोणत्याही प्रसिद्धिविना काम करून हा बदल घडवण्यात आला आहे, असे प्रभाकर म्हणाले.
जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला
डाळी, भाज्या, मसाले, दूध अशा अन्नधान्याचे दर प्रचंड वाढले आहेत. देशातील महागाई, बेरोजगारी, मणिपूरमध्ये काय घडते आहे, या पेक्षा नागरिकांनी आपल्या आकांक्षा मोठ्या ठेवाव्यात असे सरकारला वाटते, असे म्हणत प्रभाकर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
लाखोंनी देश सोडला
डॉ. प्रभाकर म्हणाले, २०१४ मध्ये १ लाख २९ हजार भारतीयांनी देश सोडला होता, तर २०२२मध्ये २ लाख २५ हजार भारतीयांनी देश सोडला. ग्रामीण भागातील स्थिती गंभीर आहे. सरकारने उद्योगांची कर्जे निर्लेखित केली, कॉर्पोरेट कर कमी केला, उद्योगांना विनंत्या करूनही देशांतर्गत गुंतवणूक वाढलेली नाही. गेल्या आर्थिक वर्षात मनरेगासाठी केलेली तरतूद ६ महिन्यांतच संपली.
राज्यपालही अडून
डॉ. प्रभाकर म्हणाले, केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध चांगले नाहीत. केंद्र सरकारने अधिमूल्य, अधिभार लावून ४० लाख कोटी रुपये मिळवले. राज्य सरकारने पारित केलेली विधेयके राज्यपाल मंजूर करत नाहीत. संघराज्य व्यवस्था म्हणून पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री हे एक चमू म्हणून दिसत नाहीत.
मोदींना मणिपूर दिसले नाही
मोदी सरकारला टोला लगावताना डॉ. प्रभाकर म्हणाले, आताचे दिवस परिवाराचे आहेत. जी २० मध्ये वसुधैव कुटुम्बकम ही संकल्पना होती. अवघे जग माझे घर म्हणताना आपल्याच देशातील मणिपूर आपले नाही का. वसुधैव कुटुम्बकमचा संदर्भ महोपनिषद या दुय्यम उपनिषदात आहे.संस्कृतमध्ये बोलून लोकांना सहज मूर्ख बनवता येते. संस्कृतमधील सारे काही हजार वर्षांपूर्वीचेकिंवा प्राचीन नसते. पण आता यावर विश्वास ठेवायला लावला जात आहे. नव्या भारताला प्राचीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप प्रभाकर यांनी केला.