24.5 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeराष्ट्रीयदेशाची अर्थव्यवस्थाही अटकेपार झेंडा रोवेल

देशाची अर्थव्यवस्थाही अटकेपार झेंडा रोवेल

साहित्य संमेलनात मराठी उद्योजकांनी व्यक्त केला विश्वास मराठी तरुणांना केले व्यवसायासाठी प्रेरित

छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : विनायक कुलकर्णी
संकल्पना, मनुष्यबळ, कौशल्य, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची निती, योग्य शिक्षण या सगळ्यांची योग्य मोट बांधली तर राज्याची नव्हे तर देशाची अर्थव्यवस्था ट्रिलीयन इकॉनामीपर्यंत नक्की पोहोचेल आणि मराठीप्रमाणे अटकेपार झेंडा रोवेल असा विश्वास ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केला.

दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुस-या दिवसाच्या पहिला सत्रात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, ‘केपीआयटी’चे प्रमुख रवी पंडित, ‘बीव्हीजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड सहभागी झाले होते. त्यांच्याशी पत्रकार, निवेदक प्रसन्न जोशी यांनी संवाद साधला. सेवा, शिक्षण आणि अन्य उद्योग क्षेत्रात जेव्हा जेव्हा मराठी पाऊल पुढे पडते तेव्हा तेव्हा त्याची दखल साहित्याच्या माध्यमातून घेण्यात येते. सरस्वतीची उपासना करून लक्ष्मीला प्रसन्न करता येते हे गेल्या पन्नास वर्षात मराठी माणसाला उमगले आहे.

आता मराठी माणसाला व्यवसाय करणे गैर वाटत नाही. व्यवसायात असलेली ‘रिस्क’ घेण्यासाठी आपली मानसिकता तयार झालेली आहे असे करंदीकर म्हणाले. यामुळे आता मराठी माणसांनी उद्योग उभा करण्यासाठी आपला आत्मविश्वास आणखी दृढ करावा. जेणे करून मराठी उद्योजक मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. यामुळे मराठी तरुणांनाही रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याच्या संधी निर्माण होतील.

मराठी तरुणांनी झोकून देऊन काम करावे
मराठी तरुणांनी आपले आवडते क्षेत्र निवडावे व त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी देशातील शेतक-यांची प्रगती अत्यंत महत्त्वाची आहे. गावातच सर्व सुविधा मिळतील अशा दृष्टीने नियोजनही महत्त्वाचे आहे. गावातच उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील त्यासाठी काम करावे लागणार आहे. आपण दहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून काम करत असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

संधींचा शोध घ्या : गायकवाड
उद्योग क्षेत्रात भरारी घेताना आपल्या कामात गुणवत्ता राखली पाहिजे. त्यात सर्वोत्कृष्टपणा आणला पाहिजे. कोणत्याही कामाची लाज न बाळगता ते काम सर्वोत्कृष्ट पद्धतीने केले पाहिजे. जगात संधी आहेत. संधींचा शोध घेतला पाहिजे. मराठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वास्को-द-गामासारख्या खलाशाकडून शोधाची गरज आणि धाडस यासाठी प्रेरणा घेणे गरजेचे आहे असे गायकवाड म्हणाले.

कष्टाच्या मागे धावा
स्टार्टअप इकोसिस्टीम, स्टार्ट अप नेशन या संकल्पनांबाबत माहिती देताना पंडित म्हणाले, कोणतेही काम करताना भावना, महत्त्वाकांक्षा, जिद्द महत्त्वाची ठरते. आपले व्यक्तिमत्व हे आपल्या शब्दांपेक्षा अधिक बोलते. जीवनात काहीतरी भव्य दिव्य करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. आराम हराम आहे, कष्टाच्या मागे धावले पाहिजे म्हणजे यश मिळतेच, असा संदेशही त्यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR