31.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeराष्ट्रीयदेशातील पहिला लाईट वेट रणगाडा जोरावर सज्ज

देशातील पहिला लाईट वेट रणगाडा जोरावर सज्ज

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या स्वदेशी लाईट वेट टँक जोरावर डेव्हलपमेंट ट्रायल्स सुरू झाल्या आहेत. याच्या यूजर ट्रायल्सही एप्रिलपर्यंत सुरू करण्याचा डीआरडीओचा प्रयत्न आहे. दोन्ही ट्रायल्स भारतीय लष्कराकडून केल्या जाणार आहेत. डीआरडीओच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्वदेशी लाईट वेट टँकमध्ये इंजिन बसवण्यात आले असून सध्या १०० किलोमीटरपर्यंत हा टँक चालवून पाहण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने डीआरडीओला ५९ जोरावर रणगाडे बनवण्याची ऑर्डर दिली होती. हे टँक एल अँड टी कंपनीद्वारे तयार केले जात आहेत. या टँकचे डिझाईन डीआरडीओने तयार केलेले आहे. याशिवाय २५९ लाईट टँकची मागणी असून त्यासाठी सात ते आठ कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. भारतीय लष्कर चीन सीमेजवळ लडाखमध्ये जोरावर रणगाडे तैनात करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. जोरावरला पंजाबी भाषेत बहादूर म्हणतात. हे एक आर्मर्ड फायटिंग व्हेइकल आहे. याच्या कवचावर कोणत्याही हत्याराने करण्यात आलेल्या हल्ल्याचा परिणाम होणार नाही. शत्रूने कोणत्याही शस्त्राने हल्ला केला, तरीदेखील या रणगाड्यामध्ये असलेले जवान सुरक्षित राहतील, असा दावा डीआरडीओने केला आहे. या रणगाड्याच्या मारक क्षमतेबाबत बोलायचे झाले तर हा सर्वात वेगाने पुढे जाऊ शकतो. तसेच यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली बसवण्यात येणार आहे.

जोरावर टँक हलके असल्याने ते कुठेही उचलून नेणे सहज शक्य असणार आहे. त्याची कॉर्ड १२० मिमी असेल. स्वयंचलित लोडर असेल. एक रिमोट वेपन स्टेशन असेल, ज्यामध्ये १२.७ मिमी हेव्ही मशीन गन स्थापित केली जाईल. त्याच्या चाचण्या २०२४ पर्यंत सुरू राहतील. त्यानंतर हा रणगाडा लष्कराच्या ताब्यात दिला जाईल. जोरावरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन इंटिग्रेशन, अ‍ॅक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीम, हाय डिग्री ऑफ सिच्युएशनल अवेअरनेस यांसारखे तंत्रज्ञान देखील असेल. शिवाय यात क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असेल. शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी उपकरणे आणि इशारा देणारी यंत्रणाही बसवण्यात येणार आहे.

२५ टनाचा हलका टँक
जोरावर टँक डीआरडीओने डिझाइन केलेला आहे. या रणगाड्याचे काही फोटोही समोर आले आहेत. हा रणगाडा तयार करण्याचे काम लार्सेन एंड टुर्बो यांना देण्यात आले आहे. भारतीय सेनेला अशा ३५० रणगाड्यांची गरज आहे. हा रणगाडा २५ टन वजनाचा आहे. तसेच हा रणगाडा चालवण्यासाठी केवळ तीन लोकांची गरज लागणार आहे.

चीन-शीख युद्धातील योध्याचे नाव
१८४१ मध्ये चीन-शीख युद्धादरम्यान कैलास-मानसरोवरवर लष्करी मोहिमेचे नेतृत्व करणा-या जनरल जोरावर सिंह कहलुरिया यांच्या नावावरून या रणगाड्याला नाव देण्यात आले आहे. सर्वात आधी रशियाकडून असे रणगाडे खरेदी करण्याचा भारताचा मानस होता. पण नंतर देशात हे रणगाडे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हा देशातील पहिला टँक असेल, ज्याला माउंटन टँक म्हणता येईल, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR