मानवत : पोलिसांच्या अजब कारवाईचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. मानवत पोलिसांचा असाच एक अजब किस्सा चव्हाट्यावर आला आहे. मानवत पोलिस ठाण्यात थेट मयत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केला आहे. मयत व्यक्तीला आरोपीच्या पिंज-यात उभा करण्यात आल्याने त्याच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरम्यान, या भोंगळ काराभाराची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.
तालुक्यातील रत्नापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ दि. १ एप्रिल रोजी तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी पान शॉप चालकाविरुद्ध मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या संदर्भात पोलिस हवालदार शेख गाझीयोद्दीन शेख हबीब यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत रामकृष्ण बलभीम ताकट रा. रत्नापूर हा गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरात त्याच्या पान शॉपमध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत असताना आढळून आला असल्याचे म्हटले आहे. आरोपीकडून २५० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आल्याचेही म्हटले आहे.
या प्रकरणाचा तपास नारायण सोळंके करत आहेत. मात्र अद्याप आरोपी अटक केलेली नाही. तपास अधिका-याला त्यांच्या सेवाकाळात कितीही शोधाशोध केली तरी हा आरोपी सापडणे शक्य नाही. कारण गुन्हा दाखल झालेला व्यक्ती हा मयत आहे. त्यामुळे कोणतीही खातरजमा न करता गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या कुटुंबियाना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, झालेल्या प्रकारामुळे पोलिस प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून या अजब कारवाईबाबत चचार्ना उधाण आले आहे.