23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeआरोग्यकर्करोग उपचारांचे दुष्परिणाम कमी करणा-या औषधाचा शोध

कर्करोग उपचारांचे दुष्परिणाम कमी करणा-या औषधाचा शोध

मुंबई : कर्करोगावर उपचार सुरू असताना अनेकदा रुग्णाच्या शरीरावर काही दुष्परिणाम होत असतात. या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटरमधील संशोधकांनी रेसवेराट्रोल रसायन आणि तांबे या घटकांचे मिश्रण असलेल्या नवीन औषधांचा शोध लावला आहे. हे औषध जूनपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.

टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघर येथील प्रयोगशाळेतील प्रख्यात संशोधक डॉ. इंद्रनील मित्रा यांनी कर्करोग औषधांवरील दुष्परिणाम दूर करण्यासाठी रेसवेराट्रोल रसायन आणि तांबे या घटकांचे मिश्रण असलेल्या औषधाचा वापर रुग्णांवर करण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांना दिसून आले, की कर्करोगाच्या उपचारात मेलेल्या पेशींमधील सूक्ष्म स्वरूपातील गुणसूत्र पुन्हा रक्तात सामावून शरीरातील इतर अवयवांमध्ये जाऊन कर्करोगाच्या पेशी तयार करतात. त्या ठिकाणी हे औषध जाऊन त्या गुणसूत्रांना निष्क्रिय करते. त्यामुळे केमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते.

संशोधनाविषयी माहिती देताना डॉ. मित्रा असे म्हणाले की, सध्या या नवीन औषधाच्या केलेल्या अभ्यासात चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यानंतर आता लवकर मोठ्या स्तरावर रुग्णांवर अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी जे औषध आम्ही तयार केले आहे ते बनवण्यासाठी काही औषध निर्मात्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. हे औषध गोळी स्वरूपात असणार आहे. या औषधाचे आणखी काही फायदे मोठ्या अभ्यासात दिसू शकतात. मात्र, ते अभ्यासाअंती कळणार आहे. विशेष म्हणजे या औषधांमध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे हे औषध घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज लागणार नाही. कर्करोगाचे उपचार घेतलेल्या रुग्णांवर या औषधाचा अभ्यास आताही सुरू आहे. यात बोन मॅरो ट्रान्सप्लांट, पोटाचा कर्करोग, जबड्यातील कर्करोग झालेल्या रुग्णांवर या औषधाचा छोटेखानी अभ्यास झाला आहे.

नव्याने शोधण्यात आलेले औषध हे एक अतिशय महत्त्वपूर्ण संशोधन आहे. येत्या काळात मोठ्या स्वरूपात या औषधाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामध्ये आणखी नवीन काही माहिती मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR