जालना : प्रतिनिधी
जालन्यात भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे बडे नेते रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यात मागील अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. भाजपा जिल्हा कार्यकारणीची सदस्य नोंदणी अभियानात दोघांमधील वाद पुन्हा एकदा दिसून आला आहे.
जालना जिल्ह्यात आज माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यकारिणीची सदस्य नोंदणी अभियानानिमित्त जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिका-यांनी उपस्थिती लावली.
मात्र भाजपचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर आणि राहुल लोणीकर यांनी पाठ फिरवली. भाजप पक्षाच्या जालना जिल्हा कार्यकारिणीवरून गेल्या अनेक वर्षांपासून रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यात वाद आहे. रावसाहेब दानवे यांची एक आणि बबनराव लोणीकर यांची एक अशा दोन भाजप कार्यकारिणी जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जालना असा एकमेव जिल्हा आहे जिथे भाजपच्या दोन कार्यकारिणी आहेत.
विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी सत्कार समारंभात दानवे यांचे नाव न घेता भोकरदनचा शनि, शकुनी मामा अशा शब्दांत टीका केली होती. शनि मागे लागला होता, मी आताच शनिची पूजा करून आलोय. शकुनी मामाने मला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप देखील लोणीकर यांनी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान केला होता.