लातूर : प्रतिनिधी
महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय १०० वे नाट्यसंमेलनानिमित्त आयोजित पूर्वरंगमध्ये दि. ११ फेब्रुवारी रोजी कै. नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या ‘रसबहार’ नाट्य संस्था निर्मित व कै. शाम फडके लिखित आणि रवी अघाव दिग्दर्शित ‘अर्ध्याच्या शोधात दोन’ या दोन अंकी कौटुंबिक नाटकाने लातूरच्या नाट्य रसिकांची मने जिंकली.
या दोन अंकी अंकी नाटकाचा प्रयोग रविवारी रात्री येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात सादर झाला. या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नेते विक्रम गोजमगुंडे, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, प्रभाकर गोजमगुंडे, युवा उद्योजक तुकाराम पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले. नटराजाच्या पूजनानंतर नाट्य प्रयोगास प्रारंभ झाला.
या नाटकात प्रमुख भूमिकेत अजय गोजमगुंडे, सुवर्णा बुरांडे, मंजुषा पाठक, अजय कातपुरे, अविष्कार गोजमगुंडे, सुधीर बिर्ले, राजीव गड्डीमे या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याचे प्रदर्शन केले. विशेषत: अजय गोजमगुंडे यांनी रमेश कुलकर्णींची भूमिका साकारताना आपल्या खास शैलीने प्रस्तुत केलेल्या ‘आपण कधी खोटे बोलतच नाही’, या संवादाने रसिकांची दाद मिळवली.या नाटकासाठी प्रकाश योजना सुधीर राजहंस, नेपथ्य नंदकुमार वाकडे, मेकअप व वेषभुषा भारत थोरात, रंगमंच व्यवस्था उदय गोजमगुंडे, प्रवीण गोजमगुंडे, रोहित साळवे यांची होती.