बोरी : जिंतूर तालुक्यातील कोक येथील बसस्थानक समोरील विविध कार्यकारी सोसायटी संस्थेच्या जागेवर गावातील एका नागरिकाने अतिक्रमण करून बांधकाम केले होते. याबाबत सहकारी सोसायटी व ग्रामपंचायतने प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने हे अतिक्रमण दि.२४ जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्तात जमिनदोस्त केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोक येथील सरकारी गोडाऊन समोरील रिकाम्या जागेत गावातील एका नागरीकाने अतिक्रमण करून या ठिकाणी बांधकाम सुरू केले होते. याबाबत ग्रामपंचायत व सरकारी विविध कार्यकारी सोसायटीने प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्या होत्या.
त्या अनुषंगाने दि. २४ रोजी दुपारी १ वाजता नायब तहसीलदार धोंडगे, विस्तार अधिकारी एस. व्ही. ढोणे, ग्रामसेवक एस. डी. धरणे, सहाय्यक निबंधक बावरी मंडळ अधिकारी सुरेश रोडगे, सचिव संजय शिंपले व ग्रामपंचायत व सरकारी सोसायटीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण पाडण्यात आले. यावेळी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे व त्यांच्या सहका-यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.