रायपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोक विचारतात की राहुल गांधी थकत नाहीत का?, यावर उत्तर देत राहुल यांनी थकत नाही, कारण जनतेचे खूप प्रेम आहे असे म्हटले आहे. भारत जोडो न्याय यात्रा आता छत्तीसगडमध्ये पोहोचली आहे. मणिपूरपासून सुरू झालेला हा प्रवास मुंबईत संपणार आहे. हा प्रवास बिहार, झारखंड, ओडिशा मार्गे छत्तीसगडमध्ये आता पोहोचला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, भाजपा सरकारने नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. सरकारच्या या निर्णयांमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले. प्रत्येक क्षेत्र काही लोकांमध्ये विभागले जात आहे. सत्ता, संरक्षण, आरोग्य, रिटेल, विमानतळ देशातील कोणत्याही उद्योगात निवडक लोक असतात, याचा अर्थ संपूर्ण यंत्रणा तीन-चार लोकांसाठी चालवली जात आहे. बाकीची जनता महागाई खाली दबली गेली आहे. हा आर्थिक अन्याय आहे.
लोकांचा कष्टाचा पैसा
लोकांच्या कष्टाचा सर्व पैसा भांडवलदारांच्या कंपन्यांमध्ये जात आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये दलित आणि मागासलेले लोक नाहीत. देशातील विविध क्षेत्रात दलित आणि मागासवर्गीयांचा सहभाग नाही. भाजपा हिंदू राष्ट्राबाबत बोलते, मात्र मागास, दलित, आदिवासी वर्गाला काहीच मिळत नाही. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळीही एकही गरीब-मजूर शेतकरी दिसला नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
न्याय मिळवून देणे हाच उद्देश
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. लोकांना न्याय मिळवून देणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. याआधी झालेली भारत जोडो न्याय यात्रा दक्षिणेकडील कन्याकुमारी येथून सुरू होऊन उत्तरेकडील काश्मीरमध्ये संपली. मात्र, यावेळी ही यात्रा ईशान्येकडील राज्य मणिपूर येथून सुरू झाली असून, मार्चमध्ये ती मुंबईत संपणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून पक्ष आपला जनाधार मजबूत करत आहे.