बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनीच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे सांगितले तर आता या प्रकरणी काळ््या स्कॉर्पिओतील पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ही काळी स्कॉर्पिओ या गुन्ह्यात वापरण्यात आली होती. या गाडीत एकूण १९ पुरावे आढळून आले. हे पुरावे आरोपींना शिक्षेपर्यंत नेणार असल्याची माहिती आहे.
या गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल हाती लागला आहे. या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी याच गाडीमधील फिंगरप्रिंट्स आणि हे पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. डाव्या बाजूच्या दरवाजावरील काचेवर २ ठसे मिळाले आहेत. जुळून आलेले फिंगरप्रिंटचे ठसे सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे आहेत, असा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोने दिला आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी गँगचा म्होरक्या सुदर्शन घुलेची आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी टाकळी शिवारात अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली होती. यातील आरोपी प्रतीक घुलेला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी प्रतीक घुलेने संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण केली, ते ठिकाण दाखवत नजीकच्या एका काटेरी झुडपातून मारहाण करण्यासाठी वापरलेली बांबूची जाड काठीही काढून दिली होती. माऊली कारखाना ते टाकळी रोडवर आम्ही संतोष देशमुख यास विविध हत्याराने मारून खून केला होता, असे प्रतीक घुलेने पंचासमक्ष सांगितले होते, अशीही माहिती समोर आली आहे.