नाशिक : आपण गिरीश महाजन यांचा पुतण्या असून पोलिस दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एकाने एका तरुणीची तब्बल ८ लाख रुपयांना फसवणूक केली आहे. या प्रकारात गिरीश महाजन यांच्या नावाचा चुकीचा वापर करण्यात आल्याने तत्काळ संबधितास अटक करण्याची मागणी भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी केली आहे.
याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अभिषेक पाटील याच्यावर नाशिक जिल्ह्यातील सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने केवळ गिरीश महाजनच नव्हे तर खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार दिलीप बनकर यांच्याशी देखील आपली जवळीक असल्याचे खोटे सांगत फसवणूक केली.
या याप्रकरणी औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार हिने (१९) सायखेडा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, अभिषेक पाटील हा आमच्या घरी वारंवार येत असे, त्याने आपण स्वत:ला गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचे सांगितले. माझ्या कुटुंबाशी त्याने जवळचे संबंध तयार केले. त्यानंतर बहिणीशी प्रेमविवाह केला. त्यानंतर आपल्याला पोलिस दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने स्वाती व तिच्या आईला मुंबईत नेले, तिथे दादरला काही दिवस ठेवले. तिथे तिला नियुक्तीची बनावट ऑर्डर दाखवली. नंतर अॅकॅडमीत प्रवेश दिला व आठ लाख रुपयांची मागणी केली. यापैकी स्वातीच्या आईने चार लाख रुपये त्याला लग्नासाठी दिले.
अभिषेक पाटील याने खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपले जवळचे संबंध असल्याचे खोटे भासवले. इतकच नाही तर निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या नावाचा स्टॅम्प पेपरही दाखविला असल्याचे आरोपात म्हटले आहे.