हिंगोली : जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील जडगाव शिवारातून वाहणाऱ्या मधोमती नदीला रविवारी सकाळी पूर आला होता. या पुरात अडकलेल्या तिघा शेतकऱ्यांचा जीव जडगाव येथीलच बाबाराव पडोळे या शेतकऱ्याने वाचविला. पडोळे यांनी दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जडगाव भागात शनिवारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला. गावातील अनेकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. शेतशिवारात शिरलेल्या पुराच्या पाण्यात आखाड्यावर बांधलेली जनावरेही अडकली होती. यात जडगाव येथील शेतकरी लव्हेकर यांचे बैल शेतात बांधलेले होते. बैलांची सुटका करण्यासाठी शिवाजी लव्हेकर पुराच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी बैलांची सुटका केली. त्यांना मात्र पुरातून बाहेर येता येत नव्हते. त्यामुळे प्रवीण लव्हेकर आणि सोपान लव्हेकर यांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली; परंतु तिघेही पुरात अडकले, तर दुसरीकडे क्षणाक्षणाला पुराचे पाणी वाढत होते.
जीव वाचविण्यासाठी तिघाही शेतकऱ्यांनी झाडाचा आधार घेतला होता; परंतु पुराचे पाणी कमी होताना दिसत नव्हते. या कालावधीमध्ये औंढा येथील तहसीलदारांशी संपर्क केला असता एनडीआरएफची टीम नांदेडवरून येत असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु पाऊस परत खूप जोरात सुरू झाल्यामुळे वाट पाहणे म्हणजे जीविताला धोका असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येत होते. तेव्हा जडगाव येथीलच बाबाराव पडोळे यांनी हिंमत करून दोरीच्या साह्याने पुरामध्ये उडी घेतली. झाडावर अडकलेल्या तीन शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले. त्यानंतर जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आले. शेतकरी बाबाराव पडोळे यांनी दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुराचे पाणी वरचेवर वाढत होते. त्यामुळे आपण पाण्यात वाहून जातो की काय, अशी भीती वाटू लागली होती. परंतु एनडीआरएफ पथक नांदेडवरुन येणार असे गावकऱ्यांनी सांगताच आनंद झाला. परंतु पथकही येईना आणि कोणीच धावून जाईना म्हणून जडगाव येथील बाबाराव पडोळे यांनी हिंमत दाखवून दोरीच्या साह्याने उडी घेतली. त्यामुळे तर आमच्या जीवात जीव आल्याचे पाण्यात आडकलेल्या नागरिकांनी सांगितले.