24.2 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजगाला गंडविणा-या ‘क्रिप्टोक्वीन’च्या मागावर एफबीआय!

जगाला गंडविणा-या ‘क्रिप्टोक्वीन’च्या मागावर एफबीआय!

क्रिप्टो फ्रॉड। हजारो कोटी लुबाडणा-या फरार रुजा इग्नाटोव्हाच्या शोधात अमेरिकी यंत्रणा, शोध घेणा-याला मिळणार ४२ कोटीचे बक्षीस

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
सध्या क्रिप्टोकरन्सीची सगळीकडे चर्चा आहे. वेगवेगळ्या देशांत या क्रिप्टोकरन्सीसाठी वेगवेगळे नियम आहेत. दरम्यान, याच क्रिप्टो जगतातील प्रसिद्ध अशा रुजा इग्नाटोव्हा या ‘क्रिप्टोक्विन’वर अमेरिकेने ५० लाख डॉलर्स म्हणजेच साधारण ४२ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

रुजा इग्नाटोव्हा या क्रिप्टोक्वीनने ‘वनकॉईन’ नावाने एक बनावट, खोटी क्रिप्टोकरन्सी चालू केली होती. या क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने जगभरातील लोकांना तब्बल ४०० कोटी डॉलर्सचा चुना लावल्याचा आरोप आहे. तिच्याविरोधात अमेरिका आणि जर्मनी या दोन्ही देशांत गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. ऑक्टोबर २०१७ मध्ये तीने अमेरिकेतून पळ काढला. तेव्हापासून फरार आहेत. सध्या अमेरिकेच्या एफबीआयकडून शोध घेतला जात आहे.

रुजा इग्नाटोव्हा ही बुल्गारिया येथील असून ती ४४ वर्षाची जर्मन नागरिक आहे. तीने सेबस्टियन कार्ल ग्रीनवूड या आपल्या सहका-यासोबत सुरुवातीला बिकॉईन नावाने एक फसवी क्रिप्टोकरन्सी लॉन्च केली होती. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये सोफिया येथे वनकॉईन नावाने आणखी एक फसवी क्रिप्टोकरन्शी लॉन्च केली. या क्रिप्टोकरन्सीच्या नावाने रुजा इग्नाटोव्हा हिने लोकांकडून अब्जो डॉलर्स जमा केले. त्यानंतर लोकांच्या लक्षात आले की ‘वनकॉईन’ नावाची क्रिप्टोकरन्सी ही बनावट आहे. या क्रिप्टोकरन्सीच्या सुरक्षेसाठी ब्लॉकचेन नाही, हे तथ्य समोर आले होते.

वनकॉईन या फसव्या क्रिप्टोकरन्सीची किंमत नेहमीच चुकीच्या पद्धतीने फसवणूक करून ठरवली जायची. एकीकडे बिटकॉईनच्या किमतीत चढ-उतार दिसायचे. पण वनकॉईनची किंमत सतत वाढलेली दिसायची.

साथीदाराला २० वर्षांची शिक्षा
‘वनकॉईन’ या क्रिप्टोकरन्सीसाठी ‘एक्सकॉइनएक्स’ नावाचे खासगी एक्सचेंज तयार करण्यात आले होते. लोकांना सहज पद्धतीने पैसे काढता येऊ नयेत, अशी त्याची रचना करण्यात आली होती. समजा तुमच्याकडे १,००० ‘वनकॉईन’ असतील तर एका दिवसात फक्त १५ वनकॉईनच विकता येत होते. जानेवारी २०१७ मध्ये मेन्टेनन्सच्या नावाखाली ते अचानक बंद करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. इग्नाटोव्हा यांच्याविरोधात आरोपपत्र निश्चित झाल्यानंतर त्या २०१७ मध्ये फरार झाल्या. इग्नोटोव्हा यांचे साथीदार ग्रीनवूड यांना २०१८ साली थायलँडमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले. ग्रीनवूड यांना २० वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला तसेच गुंतवणूकदारांना त्यांनी ३० कोटी डॉलर परत करावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR