जळकोट : ओमकार सोनटक्के
राज्यातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, ओबीसी आरक्षणामुळे व्यक्ती गरीब असो की श्रीमंत त्यांच्या मुलाला फायदा होणार आहे. समाजातील मुलांना एक टक्के गुण कमी मिळाले तर त्यांची नोकरी हुकत आहे. जन्मभर बेकार राहण्याची वेळ येत आहे, यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसता कामा नये. या आरक्षणाच्या लढाईमध्ये गोरगरीब, श्रीमंत, महिला आणि पुरुष या सर्वांनी सामील झाले पाहिजे. आज या आरक्षण लढाईमुळे राज्यभरातील ३५ लाख मराठ्यांंना आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे. हा एक या लढाईचा विजयच आहे, परंतु एवढ्यावर न थांबता राज्यभरातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई चालूच ठेवणार असल्याचा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला .
जळकोट तालुका व जांब (बु) यांच्या संयुक्त्त विद्यमाने जांब बु. येथे मराठा आरक्षण लढाईचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते उपस्थित सकल मराठा समाजातील बांधवांना मार्गदर्शन करत होते. मनोज जरांगे पाटील यांचे सभास्थळी आगमन होताच त्यांच्यावर तब्बल २५ जेसीबी द्वारे पुष्प वृष्टी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, या आरक्षणाच्या लढाईमुळे सरकार आता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून ८० टक्के आरक्षणाचे काम पूर्ण झालेले आहे.
राज्यभरामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत परंतु लातूर, नांदेड आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यांमध्ये नोंदी अतिशय कमी सापडत आहेत. या ठिकाणी देखील अधिका-यांनी कागदपत्राची योग्य तपासणी करून नोंदी शासनाला पुरवणे गरजेचे आहे. जो कोणी जाणून बुजून नोंदी लपवत असेल त्यांना या प्रक्रियेमध्ये ठेवू नका असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच काही व्यक्त्ती जाती जातीत तेढ निर्माण व्हावा म्हणून कोयत्या कु-हाडीची भाषा बोलत आहेत. परंतु त्या व्यक्तींना आपल्याला आज काहीच बोलायचे नाही. आरक्षणा मिळे पर्यंत शांत रहा आरक्षण निघाल्यावर पुढचे बघू असा देखील इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे मराठा आरक्षणाला विरोध करणा-याना दिला.
शासनाने सकल मराठा समाजाला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देणार असल्याचे सांगितले आहे जर २४ डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले तर सरकारला याची गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे सांगून पुढे देखील आपले आंदोलन तीव्र करावे लागेल परंतु हे आंदोलन शांततेमध्ये सर्वांना करायचे आहे. शांततेमुळे आज आरक्षण मिळत आहे जर सरकारने २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिले तर सर्वांनी तयारीला लागा गावा गावामध्ये बैठका घ्या, महिला पुरुष असा भेदभाव न करता खांद्याला खांदा लावून लढाईला तयार राहा, पुढचे आंदोलन अतिशय ताकदीने लढावे लागणार आहे. देशातील सर्वात मोठी जात ही मराठा आहे, आम्ही शेती करणारे आहोत कुणबी आहोत यामुळे आरक्षण घेण्यासाठी लाजू नका असे आव्हान देखील त्यांनी उपस्थित सकल मराठा समाजाच्या नागरिकांना केले . तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करा उद्रेक करू नका व मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मला मरण जरी आलं तरी चालेल परंतु तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही व मागे हटणार नाही असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
या सभेचे सूत्रसंचालन मारुती बुद्रुक पाटील यांनी केले तर या सभेच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक रमेश वाघ, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा परकोटे यांनी बंदोबस्त ठेवला होता. तसेच याप्रसंगी शेकडो पोलिसांची देखील उपस्थिती होती. या सभेच्या यशस्वीतेसाठी जळकोट तालुका तसेच जांब येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या सभेतील उपस्थित नागरिकांना अल्पोपहार तसेच पाण्याची व्यवस्था अनेक सामाजिक संघटना कडून करण्यात आली होती.