परभणी / प्रतिनिधी
युती सरकारने २०१९ ला मराठवाड्यात ४०० हजार कोटींची मराठवाडा ग्रीड योजना आणली मात्र महाविकास आघाडी सरकारने केवळ द्वेषापायी ही योजना गुंडाळून ठेवून दुष्काळी मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले. राज्यातील अनेक योजना त्यांनी बंद पाडल्या. विकास कामात ख-या अर्थाने महाविकास आघाडीनेच अडथळे आणल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केला.
जिंतुर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना शहा म्हणाले की, गेली अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या व आता सत्तेकरीता अक्षरश: हापापलेल्या महाविकास आघाडीने लोकसभे पाठोपाठ हरियाणा व आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर निगेटिव्हीटी, अपप्रचार सुरु केला असुन सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेस आघाडीचे हे प्रयत्न हरियाणात अक्षरश: फोल ठरले. महाराष्ट्रातील जागरुक मतदार काँग्रेस आघाडीचा सुपडा साफ करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, उमेदवार तथा आ. सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, राष्ट्रवादीचे प्रताप देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, गंगाधरराव बोर्डीकर, राधाजी शेळके आदी उपस्थित होते.