34.6 C
Latur
Friday, April 11, 2025
Homeसोलापूरलग्नमंडपातून वरातीऐवजी निघाली वरपित्याची अंत्ययात्रा; डीजेचा दणदणाट जिवावर बेतला

लग्नमंडपातून वरातीऐवजी निघाली वरपित्याची अंत्ययात्रा; डीजेचा दणदणाट जिवावर बेतला

पंढरपूर : डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जिवावर बेतल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले होते. मात्र, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे भरलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली आणि जेथून परण्याची वरात निघायची तेथून वरपित्याची अंत्ययात्रा निघाली. त्यामुळे पंढरपुरात हळहळ व्यक्त होत आहे.

पंढरपूर शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाला आहे. वरपित्याच्या मृत्यूमुळे देवमारे कुटुंबातील हळदीच्या लग्नमंडपात शोककळा पसरली आहे. पंढरपूर येथील सुभाष देवमारे यांच्या मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज (ता. २) दुपारी लग्न सोहळा आयोजिण्यात आला होता. डीजेच्या दणदणाटामध्ये नरदेवाची हळदीची वरात सोमवारी रात्री काढण्यात आली होती. त्यात वरपिता सुभाष देवमारे हेही सहभागी झाले होते. घरापासून काढण्यात आलेली नवरदेवाची हळदीची वरात पंढपूरमधील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात आली. डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात होता. त्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता सुभाष देवमारे जागेवरच कोसळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नातेवाईकांमध्ये घबराट पसरली.

सुभाष देवमारे यांना नातेवाईकांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित के. डीजेचा कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे वरपिता देवमारे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. या लग्नांमध्ये सध्या सर्रासपणे डीजेचा वापर करण्यात येत आहे. यापूर्वीही डीजेच्या दणदणाटामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, नियम तोडून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या या डीजेच्या दणदणाटाकडे पोलिस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती आहे. नियमांपेक्षा जास्त डेसिबल आवाज सोडणाऱ्या डॉल्बींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR