मुंबई : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस असून विरोधकांनी पेपरफुटी प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राज्यातील परीक्षा घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करत विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले.
सरकारने कठोर पावले उचलल्याशिवाय हे पेपरफुटी प्रकरण बंद होणार नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. रोज पेपरफुटीचे प्रकार होत आहेत. या महाराष्ट्रात एक रॅकेट कार्यरत आहे आणि हे रॅकेट पेपर फोडत आहेत. विद्यार्थ्यांना लाखो रुपयांना पेपर विकतात, मग विद्यार्थी परीक्षा देतात असे विद्यार्थी पास होतात आणि हुशार विद्यार्थी नापास होतात किंवा मागे राहतात, असे अंबादास दानवेंनी सांगितले. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली होती. उत्तर प्रदेश सरकारने तातडीने सर्व परीक्षा रद्द केल्या, असेही अंबादास दानवे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील परीक्षा घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढावी, सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घ्याव्यात, राज्यात सतत होणा-या पेपरफुटीने विद्यार्थी त्रस्त असून सरकार मात्र फोडाफोडीचे राजकारण करण्यात व्यस्त आहे. तलाठी भरती परीक्षेची एसआयटी चौकशी व्हावी, यासह अन्य मागण्यांचे फलक घेऊन विरोधकांनी विधान भवनाच्या पाय-यांवर घोषणाबाजी केली. पेपरफुटीमुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होते. महाराष्ट्रात पेपरफुटीचे रॅकेट सक्रिय आहे. राज्यातील परीक्षा घोटाळ्याबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.