नागपूर : प्रतिनिधी
दुष्काळ व अवकाळीच्या दुहेरी संकटाला तोंड देत असलेल्या शेतक-यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील. मदत देताना हात आखडता घेणार नाही तसेच विदर्भ व मागास भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आधिवेशनात निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत दिली.
चहापानावरील विरोधकांच्या बहिष्काराची खिल्ली उडवताना पुढच्या वेळी ‘पान-सुपारी’चा कार्यक्रम ठेऊ, असा टोला त्यांनी लगावला. सरकार सर्व विषयांवर चर्चा करायला तयार आहे. शेतक-यांना विदर्भ अधिवेशनातून काही तरी मिळाले पाहिजे. विरोधकांनी आता तरी सामंजस्याची भूमिका घ्यावी. तीन राज्यांच्या पराभवातून काही तरी शिकले पाहिजे अन्यथा लोकसभेत यापेक्षा वाईट पराभव होईल, असा पलटवारही केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला.
मुख्यमंत्री व उपुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत या वरून विरोधकांवर टोलेबाजी केली. विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे त्यामुळे पुढच्या वेळी त्यांच्यासाठी सुपारी पान ठेवायला हवे. त्यांची सवय पाहता पानसुपारीच्या कार्यक्रमाला ते येतील, असा चिमटा त्यांनी काढला.
या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे; परंतु विरोधी पक्षांनी दिलेल्या पत्रात विदर्भाचा एकही मुद्दा नाही. तसेच या पत्रावर २३ नेत्यांची नावे आहेत. मात्र त्यावर केवळ सातच आमदारांनी सह्या केल्या आहेत. काही नेते पत्रकार परिषदेत झोपले होते. सह्या करायच्या वेळीही झोपले असतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला. या शिवाय राज्यात काय चाललंय याचं भानही त्यांना नाही. त्यांनी पत्रात कंत्राटी भरतीच्या जीआरचा उल्लेख केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहीने निघालेला जीआर दीड महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी रद्द केला, हेही ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही, असा टोला त्यांनी मारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारचे नागपूरमधील हे दुसरे अधिवेशन असून विदर्भाच्या प्रश्नाची सोडवणूक करून येथील जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. मागच्या दीड वर्षात शेतक-यांना भरीव मदत केली. केंद्राच्या योजनेत आणखी ६ हजारांची भर घालून मदत केली, असेही ते म्हणाले. तसेच भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप केले गेले; पण खिचडी, बॉडी बॅगमध्ये कोणी पैसे खाल्ले हे सत्य लवकरच लोकांसमोर येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
मराठा आरक्षणाबाबत सरकारची प्रामाणिक भूमिका
मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देणार ही आमची कमिटमेंट आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आंदोलनावरून आमच्यावर आरोप करणारांनी बिद्रे कोणाला भेटला होता, याची माहिती घ्यावी, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.