मुंबई : प्रतिनिधी
मंत्री छगन भुजबळ हे कॅबिनेटमधून कुठेही निघून गेले नाहीत. त्यांची माझी चर्चा झाली त्यांना मी आश्वस्त केले आहे. हा सरसकट जीआर नसून पुराव्यांचाच जीआर आहे. त्यामुळे ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही. तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही जीआरचा अभ्यास केला आहे. त्यांचेही म्हणणे आहे या जीआरमुळे ओबीसींवर परिणाम होत नाही. सर्वच समाजाला सोबत घेउन जाणारे राजकारण आम्ही करतो. त्यामुळे मराठा समाजासह राज्यातील इतर अठरापगड जातींच्याही कल्याणाचे कार्य आम्ही करत राहू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छगन भुजबळांच्या नाराजीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छगन भुजबळ यांच्याशी माझी चर्चा झाली असून त्यांना मी आश्वस्त केले आहे. मराठवाडयात इंग्रज नाही तर निझामाचे राज्य होते. त्यामुळे इंग्रज राज्यातील पुरावे इतर ठिकाणी मिळतात. मराठवाडयात मिळत नाहीत. तिथे निजामकाळातील म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या नोंदी मिळतात. तेच आपण ग्राहय धरले आहेत. जे खरे कुणबी असतील त्यांनाच ते मिळणार.
जे खरे हक्कदार आहेत त्यांना मिळेल. पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही असाच हा जीआर आहे. ओबीसी नेत्यांनीही हे मान्य केले आहे. छगन भुजबळ यांच्याही मनातील शंका दूर करू. हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसी वर अन्याय होउ देणार नाही. एका समाजाचे काढून दुस-याला देणार नाही. मराठयांचे मराठयांना तर ओबीसींचे ओबीसींना देणार आहोत. ज्यांना खरा अधिकार आहे ते ते देणार. दोन समाजांना समोरासमोर आणणार नाही असेही ते म्हणाले.
आम्ही सर्व समाजाला सोबत घेउन जाणारे राजकारण शिकलो. मराठा समाज महत्वाचा समाज आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिलेला हा समाज असून त्याचे कल्याण झाले पाहिजे पण महाराष्ट्रात अठरापगड जाती आहेत. त्यांनीही छत्रपतींच्या स्वराज्यात योगदान बलिदान दिले त्यांचेही कल्याण केले पाहिजे असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.