कणकवली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अनेक ठिकाणी नवीन राजकीय समीकरणांची उभारणी होत आहे. कणकवली नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तर या समीकरणांनी वेगळेच वळण घेतले आहे.
शहर विकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शनासाठी नीलेश राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या घरी नेत्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी महायुतीकडे केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांच्या मते, त्यांनी काही दिवस प्रतीक्षा केली, मात्र भाजपच्या उच्चस्तरावर निर्णय होत नसल्याने स्वतंत्र पावले उचलावी लागली. नारायण राणे साहेबांना सर्व कळवूनच आम्ही शहर विकास आघाडीत आलो. त्यांनीदेखील सांगितले की थांबू नका, स्वतंत्र निर्णय घ्या, असे नीलेश राणे यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, कणकवलीतच नव्हे तर इतर तीन ठिकाणीही शिवसेनेचा झेंडा लागेल, यावर आमचा विश्वास आहे.
या सर्व घडामोडींमध्ये नितेश राणे यांचे नाव वारंवार घेतले जात असले तरी नीलेश राणेंनी त्यांच्यावर कोणतीही टीका न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी सांगितले की, नाते असते ते तुटत नाही आणि तुटणारही नाही. निर्णय जिल्ह्यातून नाही तर वरच्या स्तरातून झाला आहे. त्यांनी स्टार प्रचारकांची ४० जणांची यादी असल्याचेही म्हटले आणि योग्य वेळ आल्यावर नावे जाहीर केली जातील, असे संकेत दिले. शहर विकास आघाडीला विजय मिळवून देण्यासाठी ते स्वत: सक्रिय झाल्याचे त्यांनी जाहीर केले. युती तुटण्यामागचे सर्व निर्णय भाजपच्या उच्च नेत्यांनी घेतल्याचा त्यांचा ठाम दावा आहे.
राज्य स्तरावरील राजकीय भवितव्यावर प्रभाव
या युतीत भाजप व अजित पवार गट एकत्र लढत असल्याने राजकीय समीकरणांना वेगळाच रंग चढला आहे. स्थानिक स्तरावर अनेक वर्षांचे वैचारिक वैर विसरून पक्ष एकत्र आले असून दोन्ही गटांचे कार्यकर्ते आता पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत. दुसरीकडे शहर विकास आघाडीचे कार्यकर्तेही संयुक्त मोर्चा उभारत असून सर्वपक्षीय बॅनरखाली मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. कणकवलीतील ही निवडणूक त्यामुळे केवळ स्थानिक न राहता जिल्हा तसेच राज्य स्तरावरील राजकीय भवितव्यावर प्रभाव टाकणारी म्हणून पाहिली जात आहे.
राणे कुटुंबाची दोन भिन्न राजकीय दिशा
कणकवलीमधील राजकीय वादळ इथेच थांबत नाही. नीलेश राणेंनी राज्यभरही असेच राजकीय समीकरण दिसू शकते, असे संकेत दिले आहेत. हा पॅटर्न राज्यभर दिसू शकतो, असे म्हणत त्यांनी भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडींचे दार खुले ठेवले आहे. नितेश राणेही मित्रपक्षावर पातळी सोडून टीका करणार नाहीत, असे म्हणत आहेत. त्यामुळे राणे बंधूंचा संघर्ष वैयक्तिक पातळीवर नसून निवडणूक व राजकीय धोरणांपुरता मर्यादित असल्याचे दिसत आहे. एकीकडे नितेश राणे वैचारिकदृष्टया भाजपसोबत ठाम आहेत, तर दुसरीकडे नीलेश राणे स्थानिक समीकरणांच्या आधारे शहर विकास आघाडीतून मैदानात उतरले आहेत. परिणामी ही लढत राणे कुटुंबाची दोन भिन्न राजकीय दिशा प्रतिबिंबित करणारी ठरत आहे.

