मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप होत असलेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पुण्यात वाल्मिक सीआयडी कार्यालयात जाऊन वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केले. त्यानंतर या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत दोषींना फासावर लटकवणार असून गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही आणि कोणालाही सोडणार नाही, असा इशारा फडणवीसांनी दिला.
मुंबई माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणात कुणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा, ज्या ज्या प्रकरणात संबंध आढळेल; त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. कोणालाही अशा प्रकारची हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे. त्यामुळेच आज त्यांना (वाल्मीक कराड) त्याठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतील जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम या कामाला लागल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. सगळ्यांना शोधून काढू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.