लखनौ : ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. वाराणसी न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “जिल्हा प्रशासनाला सात दिवसांत पूजा करण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाने हे करताच पूजा सुरू होईल. जैन यांनी मशिदीच्या आवारात पूजा करण्याच्या नियमांवरही भाष्य केले आहे.
जैन म्हणाले की, पूजा कशी करायची याचा निर्णय काशी विश्वनाथ ट्रस्ट घेईल. त्यांना याबाबत चांगलेच माहित आहे. हे आमचे कायदेशीर काम होते जे आम्ही पूर्ण केले आहे. आता पूजा सुरू करणे काशी विश्वनाथ ट्रस्टवर अवलंबून आहे. भक्तांपासून पुजारी इ. प्रत्येकाला जाण्याची परवानगी दिली जाईल. मला म्हणायचे आहे की न्यायमूर्ती के.एम. पांडे यांनी १ फेब्रुवारी १९८६ रोजी राम मंदिराचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते. त्या तुलनेत मला आजचा आदेश दिसतो. हा या प्रकरणाचा टर्निंग पॉइंट आहे. एका सरकारने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हिंदू समाजाची पूजा बंद केली होती, आज न्यायालयाने आपल्या लेखणीने ती दुरुस्त केली आहे.