लंडन : अवयवदान हे सर्वात महान दान मानले जाते. आजकाल अनेक लोक इतरांसाठीही आपले अवयव दान करताना दिसतात. संपूर्ण जगात अवयव दानाची मोहीम उघडण्यात आलीय. त्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. पण, ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कोर्टात घटस्फोटाची केस सुरु होती. कोर्ट निकाल देण्याच्या निष्कर्षापर्यंत आले. याचवेळी पतीने पत्नीची किडनी मागितली. पतीच्या या मागणीमुळे पत्नीला धक्का बसला. तर, कोर्टही पतीच्या या मागणीने अचंबित झाले. कोर्टाने ही मागणी मानवीदृष्ट्या चुकीची आहे असे म्हणत पतीची मागणी फेटाळली.
ब्रिटनमध्ये राहणा-या रिचर्ड बॅटिस्टा याचे लग्न १९९० मध्ये डोनेल हिच्याशी झाले. या जोडप्याला तीन मुले आहेत. २००१ मध्ये डोनेल हिची तब्येत सारखी बिघडू लागली. डॉक्टर तपासणीत डोनेल हिच्या दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणे बंद केल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी डोनेल हिला किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.
पत्नी डोनेल हिचा जीव वाचविण्यासाठी पती रिचर्ड याने आपली एक किडनी तिला दान केली. डोनेल हिचा जीव वाचला. ती आनंदात होती. पण, किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर ४ वर्षांनी तिचे अन्य एका पुरुषासोबत प्रेमसंबध जुळले. त्यामुळे डोनेल हिने रिचर्डला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटाचा खटला नुकताच कोर्टात दाखल करण्यात आला. रिचर्ड याने कोर्टामध्ये पत्नी डोनेल हिचे दुस-यासोबत अफेअर असल्याचा दावा केला. त्यामुळेच घटस्फोट घेत आहे. आपण आपली एक किडनी पत्नीचा जीव वाचविण्यासाठी दिली होती. मात्र, ती दुस-यासोबत राहू इच्छिते त्यामुळे एक तर त्याला त्याची किडनी परत करावी किंवा किडनीच्या बदल्यात १.२ मिलियन पौंड देण्यात यावेत अशी मागणी त्याने केली.
कोर्टाने काय म्हटले?
रिचर्ड याची ही मागणी ऐकून कोर्ट अचंबित झाले. त्यांनी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेतला. त्यांचे असे म्हणणे आहे की, एकदा एखाद्याकडून किडनी घेतली की ती परत देणे शक्य नाही. यासाठी डोनेलला पुन्हा त्याच ऑपरेशन प्रक्रियेतून जावे लागेल. तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे. ती किडनीही काढून टाकल्यास ती वाचणे अशक्य आहे. यानंतर मॅट्रिमोनिअल रेफरी जेफ्री यांनी निकाल देताना, रिचर्डची नुकसानभरपाई आणि किडनीची मागणी केवळ कायदेशीर उपायांच्या विरोधात नाही तर मानवीदृष्ट्याही चुकीची आहे असे म्हटले.