मुंबई : राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण हा सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. राममंदिराचे निमंत्रण हा एका पक्षाचा विषय झाला आहे. हा कार्यक्रम रामलल्लासाठी नाही, तो भाजपचा कार्यक्रम आहे, असे राऊत म्हणाले. तसेच आम्ही किंवा शरद पवार निमंत्रणाची वाट पाहणार नाही, असेही राऊतांनी सांगितले.
संजय राऊत म्हणाले, राम मंदिराचे निमंत्रण कुणाला मिळाले माहिती नाही परंतु हा एक पार्टीचा विषय झाला आहे. राम मंदिराचे उद्घाटन हा भाजपचा कार्यक्रम आहे. रामलल्लासाठी हा कार्यक्रम नाही. संपूर्ण देशाला निमंत्रण द्यायचे असते. देव स्वत: त्यांच्या भक्ताला बोलवत असतो आणि भक्त जात असतात. आमचे श्रीरामाशी वेगळे नाते आहे. भाजपला जे करायचं ते करू द्या. आम्ही इथे किंवा शरद पवार निमंत्रणाची वाट पाहणार नाही.
प्रभू श्रीरामाचे अपहरण झाले आहे
संपूर्ण देशात नेत्यांना प्रश्न विचारला जातोय तुम्हाला निमंत्रण आलं का? हा भाजपचा कार्यक्रम आहे. राम मंदिर उत्सव नाही, यूपीमध्ये आणि दिल्लीत भाजप सरकार आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामाचे अपहरण केले आहे. भाजपचा कार्यक्रम झाला की आम्ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ. आम्हाला आमंत्रणाची गरज नाही. आम्ही स्वत:च दर्शनाला जाणार आहोत. हा भाजपचा कार्यक्रम आहे, त्यांना तो करू द्या, असे देखील संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका
भारतीय संसदेचे उद्घाटन झाले तेव्हा हाच प्रकार झाला, हे सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत. देशासाठी ज्यांचे काहीच योगदान नाही त्यांनी संसदेचे उद्घाटन केले. अयोध्येसाठी त्यांचे काहीच योगदान नाही. ते राम मंदिर उत्सव करत आहेत, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.