Homeपरभणीमुंबईतील त्या घटनेचा पाथरीत धसका; कलिंगड बाजारपेठेत शुकशुकाट!

मुंबईतील त्या घटनेचा पाथरीत धसका; कलिंगड बाजारपेठेत शुकशुकाट!

पाथरी (अनवर शेख) : मुंबईत कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटताना दिसत असून, पाथरी शहरातील कलिंगड व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे. कधीकाळी उन्हाळ्यातील सर्वात आवडीचे फळ मानले जाणारे ‘कलिंगड’ आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

बाजारपेठेत शुकशुकाट
उन्हाळ्याचा पारा ४०°C पार गेल्याने पाथरी शहरात रसाळ कलिंगडांना मोठी मागणी होती. मात्र, मुंबईतील घटनेची बातमी सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलवर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पाथरीतील कलिंगड प्रेमींमध्ये भीतीचे वातावरण आहे. रसाळ आणि लालभडक कलिंगड पाहून एकेकाळी तोंडाला पाणी सुटणारे पाथरीकर आता कलिंगड विक्रीच्या गाड्यांकडे शंकेच्या नजरेने पाहत आहेत.

कलिंगड प्रेमी द्विधेत
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी कलिंगड हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मात्र, सध्या नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. कलिंगडमध्ये रासायनिक इंजेक्शनचा वापर केला जातो का?, कीडनाशकांचा अतिवापर विषबाधेला कारणीभूत आहे का? या प्रश्नांमुळे “कलिंगड खावे की नको?” अशा द्विधेत नागरिक अडकले आहेत. खबरदारी म्हणून अनेक ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.

विक्रेत्यांचे आर्थिक गणित कोलमडले
मुंबईतील घटनेचा थेट फटका पाथरीतील स्थानिक विक्रेत्यांना बसला आहे. विक्रेत्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “आम्ही नैसर्गिकरीत्या पिकलेली फळे विक्रीसाठी आणतो, परंतु ग्राहकांच्या मनात बसलेली भीती दूर करणे कठीण झाले आहे. दुपारच्या वेळी जिथे कलिंगड घेण्यासाठी झुंबड उडायची, तिथे आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे.” उन्हाळ्याच्या हंगामात होणारी ही मोठी आर्थिक घट विक्रेत्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR