नवी दिल्ली : संसदेतील सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदी म्हणाले की, संसद परिसरात झालेली घटना चिंताजनक आहे आणि याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. तपास यंत्रणा या घटनेचे गंभीरतेने चौकशी करत आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अशा विषयांवर प्रत्येकाने वादविवाद किंवा विरोध टाळावा, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, संसदेत घडलेल्या घटनेचे गांभीर्य अजिबात कमी लेखू नये. त्यामुळे सभापती गंभीरपणे यासाठी आवश्यक उपाय करत आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणाचा काटेकोरपणे तपास करता आहेत. यामागे कोण आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे याच्या तळापर्यंत जाणे देखील तेवढेच आवश्यक आहे. तसेच दुसरीकडे यावर उपाय देखील शोधले गेले पाहिजेत. अशा विषयांवार वादविवाद आणि विरोध करणे टाळले पाहिजे. संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे विरोधकांकडून मोदी सरकारला धारेवर धरले जात आहे. विरोधकांकडून या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही सभागृहात निवेदन करावे आमि यानंतर संसदेच्या सुरक्षेवर चर्चा केली जावी अशी मागणी केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
१३ डिसेंबर रोजी संसदेत काही लोक घुसल्याचा प्रकार समोर आला होता. व्हिजीटर पास घेऊन आतमध्ये आलेले हे दोघे गॅलरीतून उड्या मारून सभागृहात उतरले, यानंतर त्यांनी बुटांमध्ये लपवलेल्या स्मोक गॅस सभागृहात धूर केला. हे तरूण एकजण लखनौ येथील सागर शर्मा आणि दुसरा मैसूर येथील मनोरंजन डी असल्याची माहिती समोर आली. दोघांना भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारसीनंतर पास मिळाले होते. जेव्हा सभागृहात हे होत असताना तेव्हाच संसदेबाहेर त्यांच्या साथिदारांनी देखील गदारोळ केला. नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनी संसदेबाहेर स्मॉक गॅस सोडला आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी या दोघांना तत्काळ ताब्यात घेतले.
सहा आरोपी अटकेत
आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार ललित झा याने पोलिसांसमोर सरेंडर केले होते. दरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात यूएपीए कलमांतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच आठ सुरक्षा रक्षकांना या प्रकरणी सस्पेंड देखील करण्यात आले आहे.