21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील शेवटच्या टप्प्याचे सोमवारी मतदान

राज्यातील शेवटच्या टप्प्याचे सोमवारी मतदान

१३ मतदारसंघांत तयारी, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात उद्या २० मे रोजी ५ व्या आणि अखेरच्या टप्प्यात लोकसभेच्या १३ जागांसाठी मतदान होत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील या सर्व जागा असून, मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले आहे. या सर्व जागांसाठी सोमवारी सकाळी ७ सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. या टप्प्यात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, सुभाष भामरे, शोभा बच्छावत, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, राजन विचारे, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक ५ टप्प्यात विभागली होती. सोमवारी पाचव्या व शेवटच्या टप्प्यात १३ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचा हंगाम समाप्त होईल. राज्यातील १३ जागांमध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण हे लोकसभा मतदारसंघ याचा समावेश आहे. राज्यातील १३ जागांपैकी ७ जागांवर भाजपचे उमेदवार आहेत तर सहा जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस तीन जागांवर, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) दोन जागांवर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उर्वरित ९ जागांवर रिंगणात आहे. महाराष्ट्रातील या १३ जागांसाठी दोन्ही शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २०१९ ला या सर्व जागा शिवसेना भाजपा युतीने जिंकल्या होत्या. पण राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे यावेळी सर्वच मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक होत आहे. पुढील २ टप्प्यांत म्हणजे २६ मे आणि १ जूनला राज्यातील ११४ मतदारसंघात निवडणूक होईल व ४ जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढचे २ आठवडे निकालाची प्रतीक्षा असणार आहे.

मुंबईत कडेकोट बंदोबस्त
चुरशीची निवडणूक, प्रचारादरम्यान झालेल्या चकमकी लक्षात घेऊन सोमवारच्या मतदानासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई शहरात ५ अपर पोलिस आयुक्त, २५ पोलिस उपायुक्त, ७७ सहायक पोलिस आयुक्तांसह २५ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत.

४९ जागांसाठी आज देशात मतदान
देशात ७ टप्प्यांत लोकसभा निवडणूक होत आहे. आतापर्यंत चार टप्प्यांत मतदान पार पडले असून, उद्या सोमवार, दि. २० मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या टप्प्यात देशात एकूण ४९ जागांवर मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १३ जागांचा समावेश आहे. यासोबतच उत्तर प्रदेशात १४, पश्चिम बंगालमधील ७, ओडिशातील ५, बिहारमधील ५, झारखंडमधील ३, जम्मू-काश्मीरमधील १ आणि लडाखमधील एका जागेचा समावेश आहे. या टप्प्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी, स्मृती इराणी, संरक्षणमंत्री राजनाथसिंग, चिराग पासवान, राजीव प्रताप रुडी, रोहिणी आचार्य, उमर अब्दुल्ला, पियूष गोयल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यातील मतदानानंतर ४२८ जागांवरील निवडणूक पूर्ण होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR