मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे. बंडखोरीवर हा उपाय शोधल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत विचारविनिमय केला. काही वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करण्यात आली. आमची ८० टक्के नावे अंतिम झाली आहेत, उद्यापर्यंत आणखी २० टक्के नावे ठरतील आणि १५ तारखेपर्यंत सर्व नावे निश्चित होतील असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. उमेदवारांच्या नावांची प्रदेश स्तरावरून मुंबईत घोषणा केली तर बंडखोरीचे पेव फुटेल. त्याऐवजी आधी सर्वच जिल्हा प्रभारींकडे बी फॉर्म पाठविण्यात आले असल्याने ज्यांना प्रदेशाकडून उमेदवारी दिली जाईल त्यांच्याकडे प्रभारी हे अर्ज सोपवतील आणि ते उमेदवार अर्ज भरतील, अशी रणनीती आखण्यात आल्याचे समजते.
तरच आधी यादी जाहीर
१७ तारखेच्या आत बहुतांश ठिकाणी बंडखोरी होत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले तरच आधी यादी जाहीर करा नाहीतर मुदत संपल्यानंतर ती जाहीर करा, असे मत ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे व्यक्त केल्याचीही माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांचे आदेश
प्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींमधील संभाव्य तीन-तीन नावे मागविण्यात आली. काही निवडक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ही नावे अजूनही निश्चित करण्यात आलेली नाहीत. मुख्यमंत्र्यांनी अशा जिल्ह्यांच्या अध्यक्ष/प्रभारींशी आज व्यक्तिश: चर्चा करून नावे तत्काळ पाठवा, घोळ घालू नका, असे सांगितल्याची माहिती आहे. महायुतीच्या समन्वय समितीची संयुक्त पत्र परिषद १८ नोव्हेंबरला मुंबईत होईल.

