24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाजाने जागृत राहावे, तोंडाला पाने पुसण्याचे काम

मराठा समाजाने जागृत राहावे, तोंडाला पाने पुसण्याचे काम

राज ठाकरे यांचा थेट सरकारलाच सवाल

मुंबई : ‘मराठा समाजाने जागृत राहावे. हे तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे. तामिळनाडूत एक प्रकरण झाले होते की, राज्य सरकारने अशा प्रकारचे आरक्षण दिले होते आणि त्या प्रकरणाची केस अजून सुप्रीम कोर्टात सुरू आहे. याच्यापुढे काही झालं नाही. राज्य सरकारला मुळात याबाबतचे अधिकार आहेत का? ही गोष्ट केंद्राची आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आहे. मी याआधीदेखील सांगितले की, हा खूप तांत्रिक विषय आहे. याबाबत नुकतंच सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद व्यक्त करण्यासारखे नाही. हे नक्की काय आहे ते एकदा मराठा समाजाने त्यांना विचारावे’, असे राज ठाकरे रोखठोकपणे म्हणाले.

राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेलं हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

‘१० टक्के आरक्षण दिले म्हणजे तुम्ही काय दिले? कशात १० टक्के आरक्षण दिले? तुम्हाला तसे अधिकार कुणी दिले? तुम्हाला या गोष्टीचे अधिकार आहेत का? नाहीतर परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार. मग राज्य सरकार सांगणार प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. आम्ही काही करू शकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या. याला काही अर्थ आहे का?’, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

एका जातीसाठी असे करता येत नाही
मुळात राज्य सरकारला याबाबतचे अधिकार आहेत का? देशात इतकी राज्ये आहेत, अनेक राज्यांमध्ये अनेक जाती आहेत. एका राज्यात एका जातीसाठी असे करता येत नाही. समाजाने या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मला काही कळत नाही की हे सर्व काय सुरू आहे. मुळात राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे आहेत. आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि दुष्काळ, पाण्याचा विषय एवढा मोठा आहे. पण याकडे कुणाचं लक्षच नाही. निवडणुका, जातीपातीचे राजकारण, आरक्षण याच गोष्टींकडे आमचे सगळ्यांचे लक्ष वळवायचे आणि मूळ विषयाकडे दुर्लक्ष करायचे. लोकांना भेडसावणा-या प्रश्नांवर या राज्यात काही चालू आहे का? तसे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR