17.5 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeसोलापूरमराठा-ओबीसी वाद हे भाजपचेच कारस्थान

मराठा-ओबीसी वाद हे भाजपचेच कारस्थान

बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे भाजपला आव्हान खासदार संजय राऊत

सोलापूर : राममंदिर पूर्ण झाल्याने व हिंदू-मुस्लिम वाद आता जुना झाल्याने भाजपने मराठा-ओबीसी वादाचे कारस्थान सुरू केले आहे. जात-धर्मात तेढ निर्माण केल्याशिवाय भाजपला निवडणुकाच लढता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा नवा मुद्दा शोधला आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी केले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते.

सध्या देश व संविधान वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. संविधानाचे रक्षण करणे हेच दोघांचे ध्येय आहे. २०२४ च्या निवडणुकीत दहा वर्षांची हुकूमशाही नष्ट होईल. रावणाची दहा तोंडं नष्ट झाली तशी मोदी-शहा यांची दहा वर्षांची सत्ता येत्या निवडणुकीत नष्ट होणार आहे, असे राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी स्वागत केले. यावेळी उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, प्रा. लक्ष्मण हाके, निरंजन बोद्धुल यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

इव्हीएम मशिन हॅक करता येते, याचा शोध भाजपनेच लावलेला आहे. आज जगभरातील निवडणुकीत इव्हीएम कालबा ठरविले आहे. बांगला देशाला भारताकडूनच इव्हीएमचा पुरवठा होत असे, आता बांगला देशाने देखील इव्हीएम वापरणे बंद केले आहे. भारतात मोदी- शहा यांची सत्ता असेपर्यंत लोकशाही धोक्यात आहे. भाजपने देशाच्या कोणत्याही राज्यात अगदी भाजपची सत्ता असलेल्या राज्यातही एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी केले.

निवडणूक आयोगावर विश्वास नाही
आजपर्यंत २७ वेळा मागणी करून देखील बॅलेट पेपरची मागणी मान्य करण्यात आलेली नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावयाचा आहे. मात्र निवडणूक आयोग असा निर्णय घेणार नाही. जो निवडणूक आयोग बाळासाहेबांची शिवसेना ऐ-यागै-यांना देऊ शकतो, राष्ट्रवादीवरील शरद पवारांचा हक्क नाकारू पाहतो तो निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR