मुंबई : गुजरातमधील सोहिल अश्विन शाह या व्यक्तीने समाजमाध्यमांवरून महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणसांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याची घटना उघडकीस आली असून शाहने केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहेत. या प्रकरणी ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोहिल शाहने सोशल मीडियावर मराठी लोकांबद्दल अपमानास्पद भाष्य करत, महाराष्ट्राला गुजराती लोकांनी उभारले, मराठी लोक फक्त मजूर आहेत असे वक्तव्य केले. त्याच्या विधानांमध्ये मराठी भाषकांचा आणि संस्कृतीचा घोर अवमान करण्यात आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वर नगरचे रहिवासी अशोक जाधव यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. शाहच्या विधानांवर कारवाईची मागणी करत, त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून शाहविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतूनही विरोध
या घटनेच्या आधी मुंबईतील गिरगाव परिसरातही मराठी भाषिकांवर अन्याय झाल्याची घटना घडली होती. एका व्यापा-याने मुंबईत आता मराठी नव्हे, मारवाडी बोलायचे अशी टिप्पणी करत स्थानिक मराठी लोकांना अपमानित केले होते. या घटना भाजपच्या सत्ताकाळात मराठी भाषिकांवर दबाव वाढल्याचे चित्र निर्माण करत आहेत.
मराठी जनतेत संतापाची लाट
सोहिल शाहच्या विधानांमुळे मराठी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात असून या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील स्थानिकांच्या योगदानाचा अपमान करणा-या अशा वक्तव्यांवर मराठी माणसांनी समाजमाध्यमांवर तीव्र निषेध नोंदवला आहे.
पोलिसांची कारवाई
वागळे इस्टेट पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून शाहविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन आणि नेतेमंडळींकडूनही याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे.