22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीय विशेषडेटिंग अ‍ॅप्सचा भूलभुलैय्या

डेटिंग अ‍ॅप्सचा भूलभुलैय्या

आधुनिक युगात प्रेमाचा बाजार कसा मांडला जात आहे आणि यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर अर्थकारण गुंतले आहे हे डेटिंग अ‍ॅप्सच्या उलाढालींवरून लक्षात येत आहे. २०२२ मध्ये डेटिंग अ‍ॅपवरील खर्चाबाबत भारत वेगाने वाढणारी पाचवी बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. जागतिक पटलावर डेटिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करणा-यांची संख्या २०२२ मध्ये १.९ अब्जांवर पोहोचली आहे. तथापि, या डेटिंग अ‍ॅप्सचा आधार घेत फसवणुकीचे प्रकार लक्षणीयरीत्या वाढले आहेत. तथापि, आज जवळपास सर्वच डेटिंग अ‍ॅप्स आणि साईट्स बनावट प्रोफाईलने भरलेल्या असून त्यात असंख्य स्कॅमर निष्पाप लोकांना रोमान्सच्या नावाखाली फसवताहेत. हे लक्षात घेता आपल्यालाच स्वत:ला वाचवण्याचे मार्ग शोधावे लागतील जेणेकरून ट्रिलियन डॉलरच्या लुटीमध्ये आपला एक पैसाही नसावा.

ल्लीतील एका व्यक्तीला स्वित्झर्लंडहून आलेल्या एका मैत्रिणीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. अर्थात या दोघांची मैत्री ही एका डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून झाली होती. मारेकरी हा युवतीवर एकतर्फी प्रेम करत होता तर युवती त्याला एक मित्र समजत होती. मित्राच्या देशात आणि शहरात फिरण्याच्या आमिषाला ती बळी पडली आणि जे काही घडले ती घृणास्पद होते. त्याची परिणती निर्घृण हत्येत झाली.
पूर्वी पेनफ्रेंडशिपचा जमाना होता. वर्गमित्र किंवा कार्यालयातील सहका-यांसमवेत मैत्री करण्याचे ते एक माध्यम होते. एकमेकांना पत्र पाठवणे आणि लिहिताना प्रत्येक गोष्टींचाही विचार केला जायचा. चांगले विचार, शेरोशायरीचा शोध घेत ते शब्द पत्रात उतरविले जात असत. ‘चुपके चुपके’ चालणा-या प्रेमाचा रंग काही औरच असायचा. प्रियकराने प्रेयसीला किंवा प्रेयसीने प्रियकराला लिहिलेले पत्र पुस्तकात किंवा नोट्समध्ये ठेवून द्यावे लागत होते. पहिले प्रेमपत्र लिहिणे आणि वाचणे म्हणजे चंद्र हातावर घेण्यासारखे होते. यात बराच काळ जायचा. निखळ, निर्भेळ प्रेमाचा अनुभव अलौकिक असायचा. आता चिठ्ठी राहिली नाही अन पेनफे्रंड्सशिप.

आजचा काळ ऑनलाईनचा आहे. म्हणूनच प्रेम आणि जोडीदाराचा शोध ऑनलाईनने घेतला जात आहे. याचे एक माध्यम समोर आले आणि ते म्हणजे डेटिंग अ‍ॅप. अ‍ॅपचे सदस्य व्हा, प्रोफाईल तयार करा, आवडत्या व्यक्तीबरोबर संवाद वाढवा आणि मैत्रीला चार चांद लावा. खाते सुरू करणे आणि चॅटिंग करणे सोपे असले तरी सायबर विश्व रहस्यमय आहे. कोण कसे आहे?, तो प्रत्यक्षात कसा आहे, हे जाणून घेणे शक्य नाही असे नाही परंतु कठीण आहे. समोरच्या मित्राच्या मनात काय चालले आहे, कोणता व्यक्ती कोणत्या वेशभूषेत कोणत्या रूपातून वावरत आहे, हे सांगता येत नाही. नितळ, निखळ प्रेमाच्या शोधात निघालेली मंडळी भलत्याच मार्गावर येऊन थांबतात आणि तेथून परतणेही शक्य नसते. जेव्हा ही बाब कळते तेव्हा ती गोष्ट हाताबाहेर गेलेली असते. म्हणूनच दिल्लीची श्रद्धा वालकर असो किंवा स्वित्झर्लंडची नीना या आपल्या मित्रांच्या हातून जीव गमावून बसल्या. ऑनलाईन प्रेमाचे हे दोन बळी आहेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्यग्रता असतानाही प्रचंड एकाकीपणा आहे आणि तेवढेच निर्बधही. पण स्वच्छंदीपणा अणि स्वैराचार नको एवढा बळावला की, डेटिंग अ‍ॅप्सचा व्यवसाय दिवसेंदिवस बहरतच चालला आहे. बहुतांश मंडळी डेटिंग अ‍ॅपवर प्रचंड पैसा खर्च करत आहेत. २०२२ मध्ये जगभरात प्रेम मिळवणा-यांनी डेटिंग अ‍ॅप्सवर दिल्या जाणा-या आकर्षक प्रीमियम सुविधेपोटी विक्रमी ५.९ अब्ज डॉलर खर्च केले. २०१९ मध्ये ही रक्कम ३.१ अब्ज डॉलर होती. २०२० मध्ये चार अब्ज डॉलर आणि २०२१ मध्ये ५.३ अब्ज डॉलर खर्च केले. टिंडर आणि बम्बल सारख्या डेटिंग अ‍ॅप्सवर देण्यात येणा-या अतिरिक्त सुविधा या यूजरला प्रत्येक महिन्याला अधिक व् ूज, लाईक, मेसेज आणि मोफत बूस्ट मिळवण्यासाठी मदत करतात.

२०२१ आणि २०२२ दरम्यान डेटिंग अ‍ॅप्सवरील खर्चात ६ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. एक सोपे गणित सांगता येईल. एका डेटिंग अ‍ॅप यूजरने २०२२ या आर्थिक वर्षात या अ‍ॅपवर खरेदीपोटी दररोज १६ दशलक्ष डॉलर खर्च केले. ही मंडळी आहेत, प्रेमासाठी आतुर झालेली. अशा गोष्टी पश्चिम देशातील लोकांना फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत आणि ते दिखावा करण्यासाठी करत असतात. पण केवळ परदेशातच असे घडत आहे, असे जर म्हणत असाल तर आणखी एक गोष्ट जाणून घ्या. २०२२ मध्ये डेटिंग अ‍ॅपवरील खर्चात विक्रमी वाढ नोंदली गेली असून यात भारत हा पाचव्या क्रमांकाचा बाजार म्हणून समोर आला आहे. वाढत्या बाजारपेठेमुळे भारतीयांनी २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये डेटिंग अ‍ॅप्सवर ३१ दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक खर्च केले. डेटिंग अ‍ॅप बाजारात पहिल्या स्थानी अमेरिका आहे.

त्यानंतर ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पाचव्या क्रमांकावर भारत. अमेरिकेने २०२२ मध्ये डेटिंग अ‍ॅप्सवर अडीच अब्ज डॉलर खर्च केले. आता आपण गेल्यावर्षी जगभरात डेटिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करणारे आणि वेळ व्यतित करण्यावर प्रकाश टाकू. जागतिक पातळीवर डेटिंग अ‍ॅप्स डाऊनलोडची संख्या ही १.९ अब्ज एवढ्या विक्रमी पातळीवर पोचली आणि वार्षिक आधारावर त्याची वाढ १८.८ टक्केआहे. जागतिक पातळीवर देखील अँड्रॉईड डेटिंग अ‍ॅप्सवर व्यतित केलेला वेळ २०२२ मध्ये १० अब्ज तास होता आणि हा उच्चांकी वेळ आहे. त्याचवेळी २०१९ मध्ये हा वेळ ७ अब्ज तास होता. प्रेम आणि जोडीदाराचा शोध घेणा-या अमेरिकी मंडळींसाठी डेटिंग अ‍ॅप हा सर्वांत आकर्षक बाजार म्हणून सिद्ध झाला आहे. अमेरिकेत डेटिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे प्रमाण २०२२ मध्ये वार्षिक आधारावर १०.४ टक्के वाढीसह १४८ दशलक्ष झाले. भारतात सध्या नियोजित विवाहाची परंपरा सुरू आहे. मात्र डेटिंग अ‍ॅप्सने प्रेमात क्रांती आणली आहे. तरुणवर्ग प्रेम आणि साथ मिळवण्यासाठी इंटरनेट आणि अ‍ॅप्सचा आधार घेत आहेत. भारतात टिंडर, बम्बल, हिंन्ज, हॅपेन, बदू, ओकेक्यूपिड, टूली मॅडली, क्वॅक क्वॅक, वू, लाईव्ह टॉक, लिवमेंट ब्लिस, यू, बेला यासारख्या अनेक डेटिंग अ‍ॅपचा बोलबाला आहे. त्यांच्या यूजरची संख्या वाढतच चालली आहे. मात्र त्याचे धोके देखील अधिक आहेत.

प्यू रिसर्च सेंटरच्या २०२० च्या एका अभ्यास अहवालात म्हटले, अनेक महिला डेटिंग साईट आणि अ‍ॅप्सवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे शोषणाच्या अनुभवाला बळी पडल्या आहेत. १८ ते ३४ वयोगटातील ऑनलाईन डेटर्सपैकी ५७ टक्के महिलांनी त्यांना अश्लील संदेश किंवा फोटो मिळत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी या फोटोची मागणी केलेली नव्हती. एक गोष्ट लक्षात घ्या, डेटिंग अ‍ॅप्सची अनेक संकेतस्थळे बनावट प्रोफाईलने भरलेली आहेत. त्याठिकाणी प्रेमाचा केवळ देखावा केला जातो. प्रेमाच्या नावाखाली निर्दोष लोकांना अडकविण्यात येते. त्यांना फसविण्यात येते आणि एवढेच नाही तर त्यांचा जीवही घेतला जातो. कोरोनाच्या काळात ओडिशातील रमेशकुमार स्वॅन नावाच्या व्यक्तीला पकडले आणि त्याने दहा राज्यांत २७ महिलांंसमवेत विवाह केला होता. त्यांचा पैसाही काढून घेतला होता. त्याने मध्यम वयोगटातील महिलांना जाळ्यात अडकविले आणि विशेष म्हणजे या महिला सुशिक्षित आणि सधन होत्या. दिल्लीतील श्रद्धा वालकरचे प्रकरण आठवा. तिची भेट २०१९ रोजी ऑनलाईन डेटिंग अ‍ॅप बम्बलमार्फत झाली होती. आफताब पूनावाला हा तिचा प्रियकर बनला. पण नकळतपणे आपण एका लैंगिक शोषणाला बळी पडत आहोत आणि एक दिवस तो एखाद्या जनावराप्रमाणे ठार करेल, असे स्वप्नात तरी वाटले होते का?

पुण्यात एका महिलेने एका व्यक्तीला टिंडर अ‍ॅपच्या माध्यमातून जाळ्यात अडकविले आणि पहिल्याच भेटीत तिने लाखो रुपयांचे सामान लुटले. कर्नाटकात एका महिलेने टिंडरवरच भेटलेल्या एका व्यक्तीला फसविले आणि त्याची लुटमार केली. अशा घटनांत वाढ झाली आहे. दररोज कोणते ना कोणते प्रकरण समोर येत आहे. केवळ डेटिंग अ‍ॅप्सच नाही तर सायबर गुन्हेगार हे इंटरनेटच्या जगात फेकलेल्या अशा प्रत्येक जाळ्यात अनेक निष्पापांना अडकवत आहेत. गेल्या एक वर्षात सायबर स्कॅमर्सनी लोकांना फसवत सुमारे १.०२ ट्रिलियन डॉलर रकमेवर हात मारला आहे. या आघाडीवर सरकारकडून, बँकांकडून जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत. पण सायबर पोलिसिंग असतानाही या रकमेत दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. कारण सायबर गुन्हेगार दररोज नवनवीन शक्कल लढविताना दिसत आहेत आणि याचा थांगपत्ताही आपल्याला लागत नाही. जोपर्यंत जग अस्तित्वात आहे, तोपर्यंत फसवणूक करणारे राहतील आणि लुटण्याचे नवीन मार्ग तयार करत राहतील. गुन्हेगार दोन पावले पुढे चालतो अशी म्हण आहे. हे लक्षात घेता आपल्यालाच स्वत:ला वाचवण्याचे मार्ग शोधावे लागतील जेणेकरून ट्रिलियन डॉलरच्या लुटीमध्ये आपला एक पैसाही नसावा.

-योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR