25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रघोळ मिटेना, कोंडी फुटेना

घोळ मिटेना, कोंडी फुटेना

महायुतीत ११ जागांवरून वाद, मविआची आज पुन्हा बैठक

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. परंतु पुढील जागांचा घोळ अद्याप संपलेला नाही. महायुतीतील नेते सातत्याने दिल्ली वारी करून चर्चा करीत आहेत. परंतु अजूनही महायुतीत ११ जागांचा घोळ कायम आहे, तर महाविकास आघाडीत कॉंग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा हव्या आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाने ब-याच जागांवर दावा केलेला आहे. त्यामुळे काही जागांवरून अजूनही चर्चा सुरूच आहे. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाची आज राजधानी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पुन्हा मविआची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास व्यक्त केला.

महायुतीत ११ जागांवरून पेच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ जागांवर तिढा असल्याची कबुली दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. पण तरीही तिढा कायम आहे. वर्सोवा, अंधेरी पूर्व, वरळी, वसई, मीरा भाईंदर, मानखुर्द, आष्टी, वरुड मोर्शी, निफाड, कराड उत्तर, फलटण या जागांचा आहे. तसेच मुंबईत बहुतांश जागांवर भाजप आणि शिवसेनेत पेच आहे. मानखुर्द शिवाजीनगरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माजी मंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी द्यायची आहे. पण त्यांच्या संभाव्य उमेदवारीला भाजपचा विरोध आहे.

आष्टीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारीवरून आमनेसामने आहेत. राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबे आणि भाजपच्या सुरेश धस यांच्यात स्पर्धा आहे. वरुड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. त्यांना तिकीट देण्यास भाजपचा विरोध आहे. निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर आमदार आहेत. पण तिथे भाजपच्या यतीन कदम यांना तिकीट हवे आहे. राष्ट्रवादीकडे असलेली फलटणची जागाही भाजपला हवी आहे. भाजपचे रणजीत निंबाळकर फलटणच्या जागेसाठी आग्रही आहेत. या जागेसाठी भाजपचा दबाव वाढत आहे.

दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाची आज कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीला महाराष्ट्रातील नेतेही उपस्थित होते. या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. परंतु कॉंग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, अशी पक्षश्रेष्ठीची भूमिका आहे. यासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर शनिवारी पुन्हा कॉंग्रेस कमिटीची ऑनलाईन बैठक होईल. त्यामुळे शनिवार मविआसाठी निर्णायक दिवस असेल, असे बोलले जात आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR