नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होईल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निर्णयानुसार आज सुप्रीम कोर्टात दोन्ही प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाकडून आमदार अपात्रतेची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात या प्रकरणावर नव्याने सुनावणी होणार आहे.
दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती, त्यानंतर सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपावले, राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात निकाल देताना शिवसेनेच्या एकाही आमदारावर अपात्रतेची कारवाई केली नाही .
दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्या प्रकरणात देखील राहुल नार्वेकर यांनी असाच निकाल दिला. त्यामुळे पुन्हा एकदा या निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली, आमदार अपात्रतेची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.
आमदार अपात्रता प्रकरणात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता शिवसेनेकडून करण्यात आली आहे, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अद्याप कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाहीये, त्यांच्या वकिलांनी कागदपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा अशी विनंती केली होती, ही विनंती न्यायालयानं मान्य केली असून, या प्रकरणातील सुनावणी आता तीन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.