31.7 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeमहाराष्ट्र१० हजार वर्षांतील सर्वात बोगस बजेट

१० हजार वर्षांतील सर्वात बोगस बजेट

उद्धव ठाकरे यांची टीका

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारने सादर केलेला आजचा अर्थसंकल्प मागील १० हजार वर्षांतील सर्वात बोगस असल्याची टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प पाहून मला आचार्य अत्रे यांची आठवण झाली. आज ते असते तर असा बोगस बजेट पाहून त्यांना घृणा वाटली असती आणि म्हटले असते असा बजेट मी गत १० हजार वर्षांत बघितला नाही.

अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर आता विविध राजकीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना यंदाचा अर्थसंकल्प मागील १० हजार वर्षांतील सर्वात बोगस असल्याची टीका केली. ते म्हणाले, दरवर्षीसारखा यंदाही अर्थसंकल्प सादर झाला. हा अर्थसंकल्प पाहून मला आचार्य अत्रे यांची आठवण झाली. आज अत्रे असते तर असा बोगस अर्थसंकल्प मी मागच्या १० हजार वर्षांत मी पाहिला नाही असे म्हणाले असते. मी सभागृहात बसून हा अर्थसंकल्प समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा सार काढायचा झाला तर मी असे म्हणेन की, उद्याचा सूर्य उगवणार आहे. सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन बी सुद्धा तुम्हाला मिळेल, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे.

महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी
विधानसभा निवडणुकीच्या काळात वारेमाप जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक जाहिरात मी येथे आणली आहे. या जाहिरातील शेवटची ओळ बदलून मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी अशी केली पाहिजे. सरकारने ही ओळ घेऊन यापुढे पुढे गेले पाहिजे. आम्ही थापा मारून थांबणार नाही हेच आता त्यांचे घोषवाक्य झाले आहे. ज्या गोष्टी त्यांनी यात सांगितल्या आणि मते मिळवली. पण या सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यांनी मतदारांना ज्या १० थापा मारल्या होत्या. त्यातील एकही गोष्ट सरकारने पूर्ण केली नाही.

लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाने पुसली
उद्धव ठाकरे म्हणाले, महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची हमी दिली होती. पण त्यावर या बजेटमध्ये काहीही नाही. शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनावरही यात काही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना माझे नाव भाषणात घेतले. स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही असे ते म्हणाले होते. त्यावर मी त्यांना सांगितले होते की, तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. कारण, उद्धव ठाकरे व्हायचे असेल तर दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतात. माझ्या नेतृत्वातील सरकारने नागपूर येथे शेतक-यांना कर्जमुक्त करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम जारी केला होता. त्या धर्तीवर मी मुख्यमंत्र्यांना या अर्थसंकल्पात शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचे आव्हान दिले होते.

अर्थसंकल्पात कंत्राटदारांसाठी खूप काही
आजच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी काहीही नाही. पण कंत्राटदारांसाठी खूपकाही आहे. मुंबईमध्ये ६४ हजार ७८३ कोटींची कामे होणार आहेत. ही कामे सामान्यांची नव्हे तर कंत्राटदारांच्या विकासाची आहेत. सरकारने दोन विमानतळे मेट्रोने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम अदानीचे आहे. कारण, विमानतळ अदानींना दिले असेल तर ते काम सरकारने नव्हे तर अदानींनी केले पाहिजे. हे सरकार अदानींना विमानतळाची जागा दिल्यामुळे आम्ही त्यावर रनवेही बांधून देऊ असे म्हणण्यासही मागेपुढे पाहणार नाही.

हे सरकार केवळ आपल्या मालकाच्या मित्राच्या हिताचे करत आहे. सरकार विकासाच्या नावाखाली महाराष्ट्र खड्डयात घालण्याचे काम करत आहे. सरकारने अर्थसंकल्पात पूर्वीपासून सुरू असलेली अर्ध्याहून अधिक कामे सांगितली आहेत. त्यात काहीच नवीन नाही. हा अर्थसंकल्प उद्या करू, परवा करू, नंतर करू अशा पद्धतीचा आहे. हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प आहे. असा अर्थसंकल्प मागच्या अनेक वर्षांत मांडला गेला नसेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR