पुणे : शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिस कारवाई आणखी वेगाने होत आहे. आतापर्यंत पोलिसांनी १० पेक्षा जास्त जणांना याप्रकरणात अटक केली असून ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरही कारवाई होत आहे. त्यातच, डॉ. अजय तावरेंचे निलंबन करण्यात आले असून ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. आता, याप्रकरणी पोलिसांकडून मुलाच्या आईचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी, पोलिसांकडून शिवानी अग्रवाल यांची विचारपूस केली असता, त्या घरात नसून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, सोशल मीडियावरील व्हायरल व्हीडीओनंतर तो व्हीडीओ माझ्या मुलाचा नाही, हे सांगताना ढसाढसा रडणा-या शिवानी अग्रवाल कुठे गेल्या?, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.
पोलिसांकडून एकीकडे कारवाईला जोर आला असताना दुसरीकडे अग्रवाल कुटुंब पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. अपघातातील अल्पवयीन मुलासह आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, आता पोलिसांकडून मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची देखील चौकशी होणार असल्याचे समजते. त्यातच, आता शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी क्राइम ब्रांच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. तर, शिवानी अग्रवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमके कुठे गायब झाल्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईने त्यांचा ड्रायव्हर गंगाराम यास धमकावले होते का, याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांना आणि भावांना निरोप देण्यात आला आहे. शिवानी अग्रवाल जिथे कुठे असतील त्यांना पोलिसांशी संपर्क साधायला सांगा असे पोलिसांनी म्हटले आहे.
वडिलांनी डॉक्टरांशी १४ वेळा केला संपर्क
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी रोज नवे अपडेट समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाच्या आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांच्याकडून ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरेंना १४ फोन कॉल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अजय तावरे ब्लड सॅम्पल बदलताना अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी सातत्याने बोलत होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर, अल्पवयीन आरोपी घटना घडली तेव्हा नशेत होता, हे सिद्ध होऊ नये यासाठी डॉक्टरांनी लाचेच्या लालसेपोटी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलेले असल्याचे समोर आल्यानंतर आता आरोपी डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे.