27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवजागजी येथील उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर

जागजी येथील उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर

धाराशिव : प्रतिनिधी
राजकीयदृष्या सतत चर्चेत असलेल्या धाराशिव तालुक्यातील जागजी येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैजीनाथ गुणवंत सावंत यांच्या विरोधात दि. २६ फेब्रुवारी रोजी सरपंचासह अन्य सात सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदारांकडे दाखल केला होता. परंतु अविश्वास ठराव दाखल करणा-या सरपंचासह सर्वच सातही सदस्य सोमवारी दि. ४ मार्च रोजी अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सभेला गैरहजर राहिल्याने हा अविश्वास ठराव नामंजूर झाला आहे. उपसरपंच वैजीनाथ सावंत यांनी जादुची अशी कोणती कांडी फिरवली की, पदावरून खेचणारेच ऐनवेळी पम्चर झाले. या सभेला अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. मृणाल जाधव ह्या उपस्थित होत्या.

जागजी हे धाराशिव तालुक्यातील राजकीयदृष्या महत्वाचे गाव आहे. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे आजोळ असल्याने या गावाकडे विरोधकांचे विशेषत: भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष लक्ष आहे. आता राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्याने जागजी गावातही शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एक गट खा. राजेनिंबाळकर यांच्या शिवसेनेत तर दुसरा गट पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या शिवसेनेत आहे. जागजी ग्रामपंचायतची सदस्य संख्या १३ आहे. तीन वर्षापुर्वी झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचे युवानेते, जिपचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड. दत्तात्रय देवळकर यांच्या कडून खा. राजेनिंबााळकर यांचे मामा अप्पासाहेब पाटील व बालाजी पाटील यांनी सत्ता खेचून आणली होती. त्यामध्ये पाटील गटाचे ८ तर देवळकर गटाचे ५ सदस्य निवडून आले होते.

कालांतराने पाटील गटातील सरपंचासह अन्य २ सदस्य शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र ठरले. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले. भाचपाच्या देवळकर गटाच्या सदस्या लता बंडगर सरपंच झाल्या. शिवसेनेच्या पाटील गटातून त्यावेळी उपसरपंच झालेले वैजीनाथ सावंत हे याही वेळी उपसरपंच म्हणून कायम राहीले होते. वैजीनाथ सावंत यांनी कालांतराने पालकमंत्री सावंत यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काही महिण्यांचा अवधी गेल्यानंतर ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या ३ जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्दयामुळे भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले होते. त्यामुळे पोटनिवडणूक झाली नाही. सध्या ग्रामपंचायतीत एकूण १० सदस्य कार्यरत आहेत. यापैकी सरपंचासह अन्य ७ सदस्यांनी उपसरपंच वैजीनाथ सावंत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. दि. ४ मार्च रोजी या ठरावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदर डॉ. मृणाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी श्री. अहिरे, तलाठी माळी, ग्रामविकास अधिकारी वाघे उपस्थित होते. या सभेला उपसरपंच वैजीनाथ सावंत वगळता अविश्वास ठराव दाखल करणारे एकही सदस्य उपस्थित नव्हते. त्यामुळे तहसीलदारांनी उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर झाल्याचे जाहीर केले.

देवळकरांनी जादुची कांडी फिरवली
भाजपा युवानेते अ‍ॅड. दत्तात्रय देवळकर यांच्याशी कसलीही चर्चा न करता सदस्यांनी उपसरपंच वैजीनाथ सावंत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव दाखल झाल्यानंतर दुस-या दिवशी अ‍ॅड. देवळकर यांना माहिती मिळाली होती. त्यांनी त्यांच्या गटाच्या पाच सदस्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली. त्यामुळे ते विशेष सभेला गैरहजर राहिल्याचे सांगितले जात आहे. पाटील गटाचेही तीन सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे वैजीनाथ सावंत हे उपसरपंचपदी कायम राहिले आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR